दादा भुसे यांचे नाशकात जल्लोषात स्वागत बोलण्यापेक्षा कृतीतून काम करू : भुसे
By admin | Published: December 7, 2014 01:20 AM2014-12-07T01:20:08+5:302014-12-07T01:20:50+5:30
दादा भुसे यांचे नाशकात जल्लोषात स्वागत बोलण्यापेक्षा कृतीतून काम करू : भुसे
नाशिक : सहकार व पणन राज्यमंत्री दादा भुसे यांनी काल (दि.६) नाशिक येथे शिवसेना कार्यालयास भेट दिली असता त्यांचे फटाक्यांच्या आतषबाजीने आणि ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. उपनेते, जिल्हाप्रमुख, महानगरप्रमुख असे सारे पदाधिकारी झाडून त्यांच्या स्वागतासाठी हजर होते. मात्र बहुतांश नगरसेवक अनुपस्थित असल्याने त्याविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे. सायंकाळी चार वाजेपासून शालिमार येथील शिवसेना कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी ढोल-ताशांचा गजर केला होता. सव्वापाच वाजेच्या सुमारास सहकार व पणन राज्यमंत्री दादा भुसे यांचे शिवसेना कार्यालयात आगमन झाले. त्यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीत व ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, दादा भुसे यांना मंत्रिपदाची संधी मिळाल्याने एका निष्ठावान शिवसैनिकाला न्याय मिळाला आहे. शिवसेनेत निष्ठावान शिवसैनिकाला न्याय मिळतो, हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजीमंत्री व शिवसेना उपनेते बबनराव घोलप यांनी सांगितले की, शिवसेनेत मागण्याची पद्धत नाही. जे काही मिळाले ते घ्यायचे असते. तीनवेळा निवडून आल्यानेच जिल्'ातील ज्येष्ठ म्हणून त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली. नाही तर माझ्या मुलाला मिळाली असती. सत्काराला उत्तर देताना दादा भुसे म्हणाले की, मी शिवसेनेच्या माध्यमातून समाजसेवेचे काम केले. त्याचे फळ म्हणून कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी आपली मंत्रिपदी निवड केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या, वीज व पाणीप्रश्न सोडविणे महत्त्वाचे असून, बोलण्यापेक्षा आपण कृतीतून काम करू,असे त्यांनी सांगितले.