विलगीकरण कक्षाला संस्थांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 11:47 PM2020-04-26T23:47:47+5:302020-04-26T23:48:05+5:30
वावी व आगासखिंड येथील विलगीकरण कक्षाला विविध संस्थांकडून मदतीचा हात मिळाला आहे. पंचायत समितीकडून दानशूर संस्था, नागिरकांचे आभार मानण्यात आले.
सिन्नर : वावी व आगासखिंड येथील विलगीकरण कक्षाला विविध संस्थांकडून मदतीचा हात मिळाला आहे. पंचायत समितीकडून दानशूर संस्था, नागिरकांचे आभार मानण्यात आले.
वावी येथील विलगीकरण कक्षात ३८ जण आहेत. तर आगासखिंड येथील कक्षात पुढील तयारी करण्यात आली आहे. आगासखिंड येथील विलगीकरण कक्षासाठी आर्ट आॅफ लिव्हिंगकडून ५० हजार रुपये देण्यात आले. या रकमेचे कोरोना साहित्य घेण्यात आले. वावी येथील कक्षासाठी धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेने १० हजार रुपयांचे साहित्य भेट दिले.
सॅनिटायझर, हॅण्डवॉश लिक्विड, सोडियम हायड्रोक्लोराइड, हॅण्डग्लोज, मास्क, हेड कॅप, डस्टबिन, बिस्कीट आदी साहित्याचा समावेश आहे. मास्क, हॅण्डग्लोजचे १०० नग देण्यात आले आहेत. समृद्धी महामार्ग ठेकेदारांकडून विलगीकरण कक्षाला रोज दिलीप बिल्डकॉन कंपनीकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तर कुंदेवाडी येथील जगदंबा पतसंस्थेद्वारे वावी कक्षातील नागरिकांसाठी सकाळ, संध्याकाळ जेवण दिले जात आहे. या संस्थांचे गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांनी आभार मानले. सहायक गटविकास अधिकारी प्रल्हाद बिब्बे, विस्तार अधिकारी बी. के. बिन्नर, एन. के. गुंजाळ, ग्रामविकास अधिकारी संजय गिरी आदींचे सहकार्य लाभले.