निफाड तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 05:27 PM2021-01-10T17:27:49+5:302021-01-10T17:29:21+5:30
पिंपळगाव बसवंत : जिल्ह्यात गुरुवार ते शनिवार दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्याचे प्रमुख पीक असलेल्या द्राक्ष बागांसोबत रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत, अशा सूचना आमदार दिलीप बनकर यांनी निफाडचे प्रांताधिकारी डॉ.अर्चना पटारे, तहसीलदार शरद घोरपडे व तालुका कृषी अधिकारी भटू पाटील यांना केल्या आहेत.
निफाड तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे शेतकरी हैराण होते.त्यातच गुरुवारी दुपारनंतर तसेच शुक्रवारी रात्री व शनिवारी अचानक आलेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे द्राक्ष पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . सुरुवातीला छाटणी केलेले द्राक्ष पीक काढणी करता आलेले असताना हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावला जात असल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. दोन वर्षांपूर्वी अवकाळी, मागील वर्षी कोरोना महामारीमुळे द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यातच यावर्षी अवकाळी पावसामुळे द्राक्षासोबतच रब्बी हंगामातील कांदा, हरभरा, ज्वारी, गहू आदि पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची शासनाच्या वतीने भरपाई मिळावी यासाठी लवकरात लवकर पंचनामे करावेत आणि अहवाल सादर करावा अशा सूचना निफाड तालुक्यातील संबंधित अधिकारी यांना केल्या आहेत.