राष्टÑवादीच्या इच्छुकांना कामाला लागण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 01:11 AM2019-06-16T01:11:09+5:302019-06-16T01:11:26+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा जाणून घेतानाच विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना इच्छुकांना केल्या. जिल्ह्यातील पंधरा पैकी तेरा जागांवर राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी दावा सांगितला आहे.
नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा जाणून घेतानाच विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना इच्छुकांना केल्या. जिल्ह्यातील पंधरा पैकी तेरा जागांवर राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी दावा सांगितला आहे.
राष्टÑवादी कॉँग्रेसने विभागीय बैठकांचे मुंबईत आयोजन करून पक्षाच्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून, शुक्रवारी नाशिक जिल्ह्याचा आढावा पक्ष पदाधिकाऱ्यांनी सादर केला. त्यात प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीत दोन्ही जागांवर झालेल्या पराभवाची चर्चा व कारणमीमांसा करण्यात आली. विद्यमान सरकारच्या विरोधात जनतेत रोष असल्याने त्याचा राजकीय लाभ निवडणुकीत होण्याची शक्यता होती. त्यासाठी पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीदेखील अहोरात्र मेहनत घेतली, परंतु दुर्दैवाने यश मिळू शकले नाही.
देशपातळीवर सर्वच राजकीय पक्षांची परिस्थिती अशीच झाल्याने नाशिकमध्येदेखील त्यापेक्षा वेगळे चित्र नाही. मात्र गेल्या पंचवार्षिकला विधानसभा मतदार संघनिहाय पक्षाला मिळालेली मते व यंदाच्या मतांमध्ये मोठी तफावत निर्माण झाल्याने पक्षाने त्याचाही विचार करून विधानसभेची तयारी करावी, अशा सूचनाही करण्यात आल्या.
पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत विधानसभा मतदार संघनिहाय इच्छुकांची नावेही विचारण्यात आली. त्यात जिल्ह्यातील अनेकांनी निवडणूक लढविण्याची इच्छा प्रदर्शित केल्याने पक्षाने त्यांच्या नावाची नोंद करून आत्तापासूनच मतदारसंघात कामाला लागण्याच्या सूचना केल्या. पक्ष पदाधिकाऱ्यांच्या भावनांची दखल घेत कॉँग्रेसशी जागा वाटपाच्या बोलणीत त्याबाबत विचार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
बैठकीस जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, अर्जुन टिळे, माजी आमदार जयंत जाधव, माजी खासदार देवीदास पिंगळे, हिरामण खोसकर, विष्णुपंत म्हैसधुणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, येवला, नांदगाव, चांदवड, कळवण, सिन्नर, मालेगाव मध्य, बागलाण, नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम व देवळाली या तेरा विधानसभा मतदारसंघांत पक्षाचे वर्चस्व पाहता, येत्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसकडून सदरच्या जागा सोडून घेण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.