अपुऱ्या मनुष्यबळासह परिचारिकांनी उंचावला आरोग्य सेवेचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:15 AM2021-05-12T04:15:20+5:302021-05-12T04:15:20+5:30

नाशिक : शासकीय व खासगी रुग्णालयांमध्येही परिचारिकांनी आपल्या कुटुंबाची काळजी न करता अपुऱ्या मनुष्यबळात सुध्दा दिवसरात्र तत्परतेने चांगली सेवा ...

With insufficient manpower, nurses raised the standard of health care | अपुऱ्या मनुष्यबळासह परिचारिकांनी उंचावला आरोग्य सेवेचा दर्जा

अपुऱ्या मनुष्यबळासह परिचारिकांनी उंचावला आरोग्य सेवेचा दर्जा

Next

नाशिक : शासकीय व खासगी रुग्णालयांमध्येही परिचारिकांनी आपल्या कुटुंबाची काळजी न करता अपुऱ्या मनुष्यबळात सुध्दा दिवसरात्र तत्परतेने चांगली सेवा देत कोरोना मुक्तीच्या लढ्यात डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून जीवाची जोखीम पत्करून समाजासाठी अतुलनीय योगदान दिले आहे. त्यामुळे आरोग्य सेवेचा दर्जाही उंचावला आहे.

कोरोनामुक्तीच्या लढ्यात परिचारिकांचे योगदान अतुलनीय असून आरोग्य सेवेमधील अतिशय महत्वाचा घटक असलेल्या परिचारिकांनी त्यांच्या या अखंड आरोग्य सेवेतून देवदूताचे दर्शन घडवले आहे. जगावर कोरोनाचे संकट असताना असंख्य परिचारिका देवदूत बनून रुग्णांची सेवा करत आहेत. त्यामुळे कोरोनामुक्तीच्या लढ्यातील परिचारिकांचे योगदान अविस्मरणीय बनले आहे. मात्र, आरोग्य सेवेत अशाप्रकारे अग्रभागी राहूनही अनेकदा मूलभूत सोईसुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याची खंत मात्र परिचारिकांना नेहमीच जाणवते. त्यामुळे समाजासाठी जीवाची जोखीम पत्करणाऱ्या परिचारिकांना आवश्यक त्या सुरक्षात्मक सेवा सुविधा पुरविण्यासाठी शासन, प्रशासनासह विविध सामाजिक घटकांनीही सकारात्मक प्रतिसाद देत पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.

इन्फो-

परिचारिका क्षेत्रात महिलांचे वर्चस्व

रुग्णालयात सतत कार्यरत असलेल्या नर्सेस म्हणजेच परिचारिका या रुग्णांसाठी देवदूत समजल्या जातात. आजच्या आधुनिक युगातही बहुतेक सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया कार्यरत असतात, मात्र नर्सिंग हे असे क्षेत्र आहे की तेथे अजूनही केवळ स्त्रियांचेच वर्चस्व आढळून येते.

कोट-१

कोविड परिस्थितीत दुसऱ्या लाटेचे कोणतेही नियोजन नसताना डॉक्टरांच्या बरोबरीने परिचारिकांनी अपुऱ्या मनुष्यबळासह कोरोनाचा सामना केला. शासनाकडून बेड वाढविले जात असताना मनुष्यबळ वाढविले जात नाही. पीपीई किट, नर्सेसची राहण्याची व्यवस्था यासाठीही संघर्ष करावा लागतो. सुविधांच्या अभावामुळे कुटुंबही धोक्यात येतात. अशा परिस्थितीत परिचारिका आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी स्वतंत्र अशा विशेष आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे.

पूजा पवार, अध्यक्ष नाशिक जिल्हा नर्सेस असोसिएशन

कोट-२

जनसेवेचे व्रत सांभाळताना व त्यात मिळणारे यश अनुभवताना वेगळा आनंद मिळतो. त्यासाठी कुटुंबापासून दूर राहावे लागते, हे जरी खरे असले तरी सध्या ज्यांच्यासाठी कुटुंब दूर ठेवले ते लोकही आपल्याच कुटुंबातील सदस्य असल्याची भावना मनात असते. या कुटुंबातील सदस्यांनी कोरोनाविरोधी लढ्यात आपण निश्चितच विजय मिळवू असा विश्वास बाळगून आरोग्य सेवेला सकारात्मक साथ देणे अपेक्षित आहे.

- रिना ठेपले, परिचारिका , शहरी आरोग्य सेवा केंद्र ,रामवाडी

कोट-३

सध्या कोरोनाच्या संकटात अपुऱ्या मनुष्यबळासह काम करताना परिचारिकांना प्रचंड तणावाखाली काम करावे लागत आहे. नाशिकमध्ये परिचारिकांची संख्या अत्यल्प आहे. सतत सात दिवस रुग्णसेवा केल्यानंतर परिचारिकांना राहण्याची स्वतंत्र व्यवस्था नसल्याने त्यांच्या कुटुंबानाही कोरोनाची बाधा होत असून परिचारिकांचे कुटुंबही धोक्यात आले आहे. अशास्थितीत कोरोना रुग्ण व त्यांचे नातेवाईक आक्रमक होत असल्याने परिचारिकांवरील कामासोबतच इतर ताण वाढत आहे. त्यामुळे समाजातील विविध घटकांनी , लोकप्रतिनिधींनी परिचारिकांचा कामाचा ताण लक्षात घेऊन सकारात्मक प्रतिसाद देण्याची गरज आहे.

- सीमा काळे, सेवानिवृत्त अधिसेविका, जिल्हा रुग्णालय, नाशिक

--

कोट-४

प्रशासनाकडून मनुष्यबळ वाढविण्याची आवश्यकता आहे. पीपीई किटसह अन्य मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देत कामाचा ताण कमी करणे गरजेचे आहे, कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी समाजबांधवांनी शासनाच्या ‘ब्रेक द चेन’ च्या प्रतिबंधात्मक नियमांचे स्वयंस्फूर्तीने पालन करणे आवश्यक आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी परिस्थिती समजावून घेऊन संयम पाळत घरी राहण्याची भूमिका घेतली तर रुग्णांच्या संख्येत घट होऊन कामाचा ताण हलका होऊन परिचारिकांना रुग्णांच्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे त्यांची सेवा करता येईल.

- शामा माहुलीकर प्रभारी अधिसेविका, जिल्हा रुग्णालय नाशिक

Web Title: With insufficient manpower, nurses raised the standard of health care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.