उपनगर पोलीस ठाण्यात अपुरे संख्याबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:56 AM2019-06-25T00:56:19+5:302019-06-25T00:56:38+5:30
उपनगर पोलीस ठाण्याची हद्द, लोकसंख्या आदी सर्व घटना घडामोडीचा विचार करता परिस्थिती हाताळताना पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडत असल्याने त्याचा परिणाम कायदा-सुव्यव्था अबाधित राहण्यावर होत आहे.
नाशिकरोड : उपनगर पोलीस ठाण्याची हद्द, लोकसंख्या आदी सर्व घटना घडामोडीचा विचार करता परिस्थिती हाताळताना पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडत असल्याने त्याचा परिणाम कायदा-सुव्यव्था अबाधित राहण्यावर होत आहे. आता तर पोलीस ठाण्यात कार्यालयीन कामकाज सांभाळणाºया पोलीस कर्मचाऱ्यांनादेखील बीट मार्शल नेमण्यात आल्यामुळे, तर कार्यालयीन प्रशासकीय कामकाजावरही परिणाम होऊ लागला आहे.
२०११ मध्ये नाशिकरोड पोलीस ठाण्याचे विभाजन करून उपनगर पोलीस ठाण्याची स्थापना करण्यात आली. स्वत:ची जागा नाही, अधिकारी-कर्मचारी संख्या अपूर्ण यामुळे सर्वांवर कामाचा ताण असतो. पोलीस ठाण्याला स्वत:ची जागा नसल्याने निर्माण होणाºया तांत्रिक अडचणी आदी कारणामुळे उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्यावर परिणाम होता. सद्यस्थितीला दोन पोलीस निरीक्षक, दोन सहायक पोलीस निरीक्षक, चार उपनिरीक्षक, १ महिला उपनिरीक्षक व १०० महिला-पुरुष कर्मचारी आहेत. उपनगर पोलीस ठाण्याची हद्द ३०-३५ किलोमीटरची असून, सुमारे तीन-साडेतीन लाख लोकसंख्या व १८ झोपडपट्ट्या आहेत. शहराचा दिवसेंदिवस झपाट्याने विकास होत असून, रस्त्यांची कनेक्टिव्हीटी मोठ्या प्रमाणात आहे.
वाढणारे गुन्हे लक्षात घेऊन गेल्या काही दिवसांपासून पाच बीट मार्शलचे पथके नेमण्यात आले असून, त्यासाठी ३० कर्मचाºयांना तीन पाळ्यांमध्ये विभागण्यात आले आहे. यात पोलीस ठाण्यात प्रशासकीय कामकाज करणाºया पोलीस कर्मचाºयांचीदेखील नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे कार्यालयीन कामकाजावर मोठा परिणाम होऊ लागला आहे.
अधिकारी-कर्मचारी यांच्या कमतरतेमुळे सर्वांवर कामाचा ताण पडतो. यामुळे गुन्हे उघडकीस येणे, भाईगिरी-टवाळखोरांचा बंदोबस्त करणे, गुन्हे रोखणे, नागरिक व पोलिसांमध्ये सुसंवाद अशा सर्वच प्रकारांना मर्यादा निर्माण झाली आहे. नवीन गुन्हेगार, चोरटे यांची माहिती पाहिजे तशी नसल्याने त्याचा परिणाम गुन्हे घडण्यावर व उकल होण्यावर झाला आहे.
कर्मचारी नसल्याने माराव्या लागतात चकरा
सामान्य व्यक्तीस संबंधित कार्यालयीन कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने चकरा माराव्या लागतात. ५ ते ७ कर्मचारी सिक रजेवर असून, दररोज १३-१५ कर्मचाºयांची साप्ताहिक सुटी असते. प्रसूती रजा व बालसंगोपन दोन महिला कर्मचारी सुटीवर आहेत, तर न्यायालयात तीन कर्मचारी नियुक्त आहेत. देवळालीगाव, बिटको कॉलेज, जेलरोड, दसक, गांधीनगर पोलीस चौकीत दिवस-रात्र पाळीला प्रत्येकी दोन कर्मचारी असतात. गुन्हे लिपिक कक्ष, गोपनीय शाखा, आदी ठिकाणचे नियुक्ती कर्मचारी वगळल्यास हातावर मोजण्या इतके सुद्धा कर्मचारी पोलीस ठाण्यात शिल्लक राहत नाही.