झोपडपट्टीवासीयांनाही आता विमा संरक्षण
By Admin | Published: July 2, 2014 11:54 PM2014-07-02T23:54:53+5:302014-07-03T00:22:57+5:30
झोपडपट्टीवासीयांनाही आता विमा संरक्षण
नाशिक : इंदूरच्या धर्तीवर करदात्या नागरिकांसाठी राबविण्यात येणारी अपघाती विमा योजना महापालिकेने आता झोपडपट्टीवासीयांनाही लागू केली आहे. त्यामुळे घरपट्टी किंवा स्लम चार्जेस नियमितपणे भरणाऱ्या ४८ हजार झोपडपट्टी रहिवाशांना पन्नास हजार रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे.
दहा वर्षांपूर्वी महापालिकेने करदात्या नागरिकांसाठी अपघाती विमा योजना सुरू केली. नियमितपणे मिळकत कर भरणाऱ्या करदात्याच्या चौकोनी कुटुंबासाठी ही योजना आहे. या योजनेत महापालिका ही संबंधित विमा कंपनीला करदात्यांच्या प्रीमियमची रक्कम भरते आणि त्या बदल्यात अपघाती घटना घडल्यास विम्याचे संरक्षण असलेल्या व्यक्तीला किंवा तिच्या वारसांना पन्नास हजार रुपयांपर्यंतची मदत मिळू शकते. अपघातात जायबंदी झाल्यास सुमारे पंचवीस हजार तर मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांपर्यंत मदत मिळू शकते. या योजनेत सर्पदंश झाला तरी आर्थिक मदत दिली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून ही योजना राबविली जात असताना त्यात झोपडपट्टीवासीयांचा मात्र समावेश नव्हता. परंतु महापालिकेने आता योजना विस्तारली असून, झोपडपट्टीवासीयांनाही संरक्षण दिले जाणार आहे.
३१ मार्च अखेरीस ज्या अधिकृत झोपडपट्टीवासीयांनी घरपट्टी कर किंवा स्लम चार्जचा भरणा केला आहे आणि थकबाकी शून्य आहे, अशा मिळकतधारकांनाच योजनेत विमा संरक्षण मिळेल. ३० मे २०१४ पासून २९ मे २०१५ पर्यंत युनायटेड इंडिया इन्शुरन्समार्फत हा विमा उतरविण्यात आला आहे.
अपघातग्रस्तांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी अपघाताची घटना घडल्यास एक महिन्याच्या आता युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीची नाशिक शाखा किंवा पालिकेच्या मूल्यनिर्धारण व कर संकलन, राजीव गांधी भवन येथे संपर्क साधण्याचे आवाहन विविध कर विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी केले आहे. (प्रतिनिधी)