युतीच्या निर्णयामुळे इच्छुकांची ‘घालमेल’
By admin | Published: October 29, 2016 12:39 AM2016-10-29T00:39:55+5:302016-10-29T00:40:29+5:30
युतीच्या निर्णयामुळे इच्छुकांची ‘घालमेल’
नाशिक : आगामी नगरपालिका निवडणुकांसाठी शिवसेना-भाजपाने युती करण्याचा निर्णय घेतल्याने दोन्ही पक्षांकडील ‘इनकमिंग’ थांबण्याची भीती असून, नगरपालिकांमध्ये दोन्ही राजकीय पक्षांची ऐनवेळी तिकीट वाटपाची धांदल उडाल्याची चर्चा आहे. इतकेच नव्हे तर ही युती महापालिका व जिल्हा परिषदांमध्ये कायम राहिल्यास शिवसेना व भाजपामधील इच्छुकांची घालमेल वाढणार असल्याचे बोलले जाते. आजवर स्वबळाच्या हिशेबाने भाजपा व शिवसेनेने तयारी सुरू केलेली असतानाच अचानक स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी शिवसेना - भाजपाने युती करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून जाहीर होताच अनेकांची नगरपालिकांसाठी रातोरात उमेदवारी रद्द झाल्याची चर्चा आहे. आता दोन्हीकडील इच्छुकांची संख्या आणि मर्यादित जागा पाहता युतीमधून उमेदवारी न मिळालेले आणि कुंपणावर असलेले आघाडीकडे तिकिटासाठी जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेही जिल्ह्णात राजकीय पक्षांव्यतिरिक्त निफाड व देवळा तालुक्यात जिल्हा विकास आघाडीचे ‘पेव’ फुटले असून, या युती आणि आघाडीच्या निर्णयामुळे तिकीट न मिळालेले इच्छुक जिल्हा विकास आघाडीकडे जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्णातील ७३ जिल्हा परिषद गट आणि १७६ पंचायत समिती गणांसाठी शिवसेना भाजपा युती झाल्यास अनेक इच्छुकांचे निवडणुकीआधीच पत्ते कापले जाणार आहे.
अशा परिस्थितीत या दोन्ही पक्षांना बंडखोरीची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच नाशिक, निफाड, सिन्नर, मालेगाव, नांदगाव, बागलाण येथील शिवसेना व भाजपाकडून इच्छुकांची जिल्हा परिषद गटांसाठी आधीच भाऊगर्दी वाढलेली आहे. अजूनही काही आजी-माजी सदस्य शिवसेना व भाजपाच्या वाटेवर आहेत. (प्रतिनिधी)