नगरसेवकांचे पितृपक्षात बौद्धिकभोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 01:14 AM2017-09-03T01:14:07+5:302017-09-03T01:14:17+5:30
पितृपक्ष म्हणजे पितरांना आवाहन करणारा पंधरवडा. श्राद्धविधीच्या माध्यमातून पितरांचा आत्मा तृप्त करण्याचा हा पंधरवडा. प्रामुख्याने, पितृपक्षात कोणतेही शुभकाम केले जात नाही. त्यामुळे या पंधरवड्यात मंदीचे वातावरण असते. कामकाजालाही फारसा वाव नसतो. म्हणूनच की काय, महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने नेमकी हीच संधी साधत पितृपंधरवड्यात आपल्या ६६ नगरसेवकांसाठी मुंबईत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये तीन दिवसीय कार्यशाळेचे नियोजन केले आहे. या कार्यशाळेत मान्यवर तज्ज्ञांकडून नगरसेवकांना महापालिका कामकाजाचे धडे दिले जाणार आहेत.
नाशिक : पितृपक्ष म्हणजे पितरांना आवाहन करणारा पंधरवडा. श्राद्धविधीच्या माध्यमातून पितरांचा आत्मा तृप्त करण्याचा हा पंधरवडा. प्रामुख्याने, पितृपक्षात कोणतेही शुभकाम केले जात नाही. त्यामुळे या पंधरवड्यात मंदीचे वातावरण असते. कामकाजालाही फारसा वाव नसतो. म्हणूनच की काय, महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने नेमकी हीच संधी साधत पितृपंधरवड्यात आपल्या ६६ नगरसेवकांसाठी मुंबईत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये तीन दिवसीय कार्यशाळेचे नियोजन केले आहे. या कार्यशाळेत मान्यवर तज्ज्ञांकडून नगरसेवकांना महापालिका कामकाजाचे धडे दिले जाणार आहेत.
राज्यातील महापालिका व नगरपालिका निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच भाजपा अनेक ठिकाणी सत्तेवर आली आहे. त्यात, बव्हंशी नवीन चेहरे आहेत. त्यामुळे प्रदेश भाजपाकडून नगरसेवकांसाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये महापालिकानिहाय अभ्यासवर्गांचे आयोजन केले जात आहे. या कार्यशाळेसाठी अद्याप नाशिकचा क्रमांक लागलेला नव्हता. मात्र, आता पितृपक्षातील मंदीच्या काळात भाजपाने आपल्या ६६ नगरसेवकांसाठी तीन दिवशीय कार्यशाळा भरविण्याचे नियोजन केले असून, त्याची तयारी सुरू असल्याची माहिती शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांनी दिली. महापालिकेत पहिल्यांदाच भाजपाने स्पष्ट बहुमत संपादन करत एकहाती सत्ता काबीज केली आहे. त्यात, मोजकेच नगरसेवक अनुभवी असून, बव्हंशी नगरसेवक पहिल्यांदाच महापालिकेची पायरी चढले आहेत. गेल्या सहा महिन्यांतील भाजपाचा कारभार पाहता, महासभांमध्ये भाजपाचे सदस्य फारशी चमक दाखवू शकलेले नाहीत याउलट विरोधकांनी महासभा गाजवत भाजपाला आव्हान दिलेले आहे. त्यासाठीच महापालिकेचे कामकाज कसे पाहावे, महासभांमध्ये कोणते प्रश्न मांडावेत, यापासून ते व्यक्तिमत्व विकासापर्यंतचे धडे या कार्यशाळेत दिले जाणार आहेत.