आंतरजिल्हा बदल्यांप्रश्नी मंत्र्यांनी घातले लक्ष
By admin | Published: August 20, 2016 12:40 AM2016-08-20T00:40:40+5:302016-08-20T00:41:36+5:30
२४ आॅगस्टला मंत्रालयात बैठक
नाशिक : जिल्हा परिषदेच्या आंतरजिल्हा बदल्यांमध्ये अनियमितता झाल्याप्रकरणी विभागीय आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिल्याचे उदाहरण ताजे असतानाच आता थेट ग्रामविकास राज्यमंत्र्यांनीच आंतर जिल्हा शिक्षक बदल्यांमध्ये लक्ष घातल्याचे वृत्त आहे.
येत्या २४ आॅगस्ट रोजी मुंबईला मंत्रालयात ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी आंतर जिल्हा शिक्षक बदल्यांमधील काही प्रकरणात झालेल्या अनियमितता संदर्भात जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलविली आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या काही शिक्षकांच्या २०१४ मध्येच नाशिक जिल्ह्णात बदल्या झाल्या होत्या. मात्र त्यावेळी त्यांना ना हरकत प्रमाणपत्र न मिळाल्याने त्या शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदल्या होऊ शकल्या नव्हत्या. दरम्यानच्या काळात २०१५ च्या एका शासन निर्णयानुसार नाशिक जिल्हा परिषदेचे सर्वसाधारण संवर्गासह अनुसूचित जाती व भटक्या जाती जमातीतील संवर्गातील जवळपास २२०० शिक्षक ्रअतिरिक्त ठरले आहे. त्यामुळे यंदांच्या शिक्षक बदल्यांमध्ये ९६ आंतर जिल्हा शिक्षक बदल्यांचे प्रस्ताव नाशिाक जिल्हा परिषदेने रद्द केले. त्यातील फक्त दोन अपंग शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदल्यांना मान्यता देण्यात आली. त्यामुळेच पालघर जिल्हा परिषदेकडून नाशिक जिल्हा परिषदेत आंतर जिल्हा बदलीने येऊ इच्छिणाऱ्या सुमारे ५० हून अधिक शिक्षकांच्या बदल्या यंदा होऊ शकल्या नाहीत. त्यासाठीच आता या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी २४ आॅगस्टला मंत्रालयात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांसह संबंधित शिक्षकांची बैठक बोलविल्याचे कळते. (प्रतिनिधी)