आंतरराज्य टोळीतील आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 11:45 PM2020-01-19T23:45:20+5:302020-01-20T00:06:31+5:30
उत्तर प्रदेशातून येऊन अश्विननगर भागात घरफोडी करण्याचा प्रयत्न घरमालकामुळे फसला. नागरिकांनी व पोलिसांनी चोरट्याला पकडले, तर इतर तीन आरोपी कारमधून पळून जाण्यात यशस्वी झाले. अंबड पोलिसांनी आंतरराज्य टोळीतील चोरट्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
सिडको : उत्तर प्रदेशातून येऊन अश्विननगर भागात घरफोडी करण्याचा प्रयत्न घरमालकामुळे फसला. नागरिकांनी व पोलिसांनी चोरट्याला पकडले, तर इतर तीन आरोपी कारमधून पळून जाण्यात यशस्वी झाले. अंबड पोलिसांनी आंतरराज्य टोळीतील चोरट्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सिडकोतील अश्विननगर भागातील गायत्री अपार्टमेंट येथे सुप्रिया नीलेश ठाकूर (४०) या राहतात. शनिवारी (दि.१८) सकाळी सव्वाअकरा वाजेच्या सुमारास त्या घराला कुलूप लावून खासगी कामासाठी पेलिकन पार्ककडे गेल्या. यादरम्यान घरफोडी करणारा आरोपी वसीम नसीम शेख (वय २४, रा. हापूर, उत्तर प्रदेश) याने कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
यानंतर पंधरा मिनिटांत काम आटपून सुप्रिया ठाकूर घरी आल्या तर घराचा दरवाजा उघडा पाहून त्यांनी घरात कोण आहे, अशी आरोळी मारली, यावेळी घरात असलेला शेख बाहेर आला व पळू लागला, यावेळी ठाकूर यांनी चोराला पकडा अशा ओरडल्या, यानंतर परिसरातील नागरिक व पोलिसांना माहिती मिळालयाने पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राकेश शेवाळे, अवि देवरे, भास्कर मल्ले, दीपक वाणी, प्रमोद काशीद घटनास्थळी आले. पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत.
नागरिक व पोलिसांनी पाठलाग करून पळून जाणाऱ्या शेख या चोरट्याला पकडले. ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरटा वसीम शेख याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. शेख याच्यासमवेत तीन जण होते. त्यांच्याकडे कार असून, ते घरफोडी करण्यासाठी नाशकात आले असल्याची माहिती शेख याने पोलिसांना दिली आहे.