साड्यांच्या बिलाआडून गुटख्याची आंतरराज्यीय तस्करी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:19 AM2021-08-18T04:19:51+5:302021-08-18T04:19:51+5:30
पेठ : गुजरात राज्यातून साड्यांचे बनावट बिल तयार करून महाराष्ट्रात चोरट्या पद्धतीने विमल पानमसाला व सुगंधीत तंबाखू वाहतूक करणाऱ्यांना ...
पेठ : गुजरात राज्यातून साड्यांचे बनावट बिल तयार करून महाराष्ट्रात चोरट्या पद्धतीने विमल पानमसाला व सुगंधीत तंबाखू वाहतूक करणाऱ्यांना ५० लाखांच्या मुद्देमालासह तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहीती अशी की, सोमवारी (दि.१६) रात्री गुजरातकडून नाशिककडे बेकायदेशीर गुटखा वाहतूक होत असल्याच्या खबरीवरून पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस किरण बैरागी, दिलीप रेहरे, अंबादाज जाडर आदीच्या पथकाने पेठ शहरानजीक असलेल्या पेट्रोल पंपासमोर टाटा कंपनीचे वाहन (एमएच १५ सीसी २८४२) तपासणी केली असता, साड्यांचे बंडल असल्याचे बनावट बिल तयार करून, वाहनात जवळपास ३८ लाख १९ हजार २०० रुपये किमतीचा विमल पान मसाला व सुगंधीत तंबाखू आढळून आला. यामुळे गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर गुटख्याची तस्करी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत अन्न व औषध प्रशासन नाशिक विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी संदीप देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाहन चालक सुभाष नारायण पालवे (५७) रा.देवराई ता.पाथर्डी, जि.अहमदनगर, क्लीनर शिवाजी रामू कराड (४८) रा. अहमदनगर व वाहनमालक विनित गिरीधारीलाल जग्गी रा.अहमदनगर या तिघा संशयितांसह बारा लाखांचे वाहनासह ५० लाख १९ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून, पोलीस निरिक्षक रामेश्वर गाडे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एस.सी. वसावे पुढील तपास करीत आहेत.
(१७ पेठ)
गुजरात राज्यातून चोरटी गुटखा वाहतूक करणारे वाहन.
170821\17nsk_8_17082021_13.jpg
गुजरात राज्यातून चोरटी गुटखा वाहतूक करणारे वाहन.