पालिकेच्या घरकुलांचा परस्पर विक्रीचा डाव
By admin | Published: September 8, 2015 11:25 PM2015-09-08T23:25:54+5:302015-09-08T23:26:37+5:30
फसवणुकीचे प्रकरण : मनपा प्रशासनामार्फत चौकशी सुरू
नाशिक : जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुथ्थान योजनेअंतर्गत महापालिकेच्या वतीने आनंदवली परिसरात राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेतील घरकुले बोगस प्रमाणपत्रांचे वाटप करत परस्पर विक्री करण्याचा डाव उघडकीस आला असून, प्रशासनाने याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
महापालिकेमार्फत शहरात ठिकठिकाणी झोपडीधारकांसाठी घरकुल योजना राबविली जात आहे. काही भागात लाभार्थ्यांना घरकुलांचे वाटपही करण्यात आले आहे. आनंदवली भागातही शिवनगर परिसरात मनपामार्फत ८५ घरांची योजना राबविली जात असून, सद्यस्थितीत बांधकाम सुरू आहे. लाभार्थींना घरकुल वाटपाची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नसताना आनंदवली परिसरात घरकुल वाटपाची प्रमाणपत्रे वितरित केली जात असल्याचे अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी महापालिकेचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांना माहिती घेण्यास सांगितले. त्यानुसार बहिरम यांनी तत्काळ चौकशी सुरू केली आहे. दिल्ली येथील इंदिरा गृह प्रकल्प योजना या नावाने सदर प्रमाणपत्र वाटप केले जात असून, त्यात ‘सन २०१३-१४ मध्ये घरकुल बुकिंग करण्यात आलेल्या व्यक्तींच्या उपलब्ध माहितीनुसार प्रमाणित करण्यात येते की, अमुक व्यक्ती दारिद्र्यरेषेखालील आहे. सदर व्यक्तीचा घर क्रमांक अमुक असून, आनंदवली परिसरात सन २०१७ मध्ये घरकुल वाटप करण्यात येईल’ असा उल्लेख करण्यात आला आले. याशिवाय प्रमाणपत्रावरच घरकुलासाठी जागा खरेदी-२०१५, बांधकाम -२०१६ आणि घरकुल वाटप-२०१७ असेही स्पष्ट नमूद करण्यात आले असून, कालावधी तीन वर्षांचा म्हटले आहे. प्रमाणपत्रावर इंदिरा घरकुल योजनेचा शिक्का मारताना विभागीय अधिकारी म्हणून स्वाक्षरी करण्यात आली आहे.
घरकुल योजनेच्या नावाखाली सदर प्रमाणपत्राच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने प्राप्त झालेल्या प्रमाणपत्राच्या आधारे महापालिका प्रशासनाने आता यामध्ये सहभागी असणाऱ्यांचा शोध घेत चौकशी सुरू केली आहे. सदर प्रमाणपत्र कोणाकडून वाटप केले जात आहे, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार होऊन अनेकांची फसवणूक झाली असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.
जवाहरलाल नेहरु पुनरूथ्थान योजनेअंतर्गत नाशिक शहरात दुर्बल घटकातील नागरिकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)