खासगी जागेवरील अतिक्रमण काढण्यात स्वारस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 11:36 PM2019-12-18T23:36:11+5:302019-12-19T00:05:04+5:30

महापालिकेच्या अनेक मिळकतींवर बेकायदेशीर बांधकामे होत आहेत. मात्र त्यात लक्ष घालून कारवाई न करता अतिक्रमण विभाग भलत्याच ठिकाणी कारवाई करून हात ओले करून घेत असल्याची गंभीर तक्रार करण्यात आली आहे.

 Interested in removing private space encroachment | खासगी जागेवरील अतिक्रमण काढण्यात स्वारस्य

खासगी जागेवरील अतिक्रमण काढण्यात स्वारस्य

Next

नाशिक : महापालिकेच्या अनेक मिळकतींवर बेकायदेशीर बांधकामे होत आहेत. मात्र त्यात लक्ष घालून कारवाई न करता अतिक्रमण विभाग भलत्याच ठिकाणी कारवाई करून हात ओले करून घेत असल्याची गंभीर तक्रार करण्यात आली आहे. जेलरोड येथील दोघा भावांच्या वादात विकलेल्या मिळकतीतील मूर्ती बनविण्याचा कारखाना हटविण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने एकदा नव्हे तर दोनदा बुलडोझर चालवला असून, त्यानिमित्ताने भूमाफियांना मदत करण्यात आली आणि विरोध करणाऱ्या मिळकतधारकावरच सरकारी कामात अडथळे आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी संतोष शहरकर यांनी केली आहे.
विशेष म्हणजे शहरकर यांनी तक्रार केल्यानंतर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असताना दुसऱ्यांदा पुन्हा कारवाई का केली याचे कारण देण्याऐवजी अतिक्रमण विभागातील अधिकारी जुनेच न्यायालयाचे आदेश दाखवत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
मौजे दसक येथे शहरकर यांच्या मिळकतीसंदर्भात त्यांच्या भाऊबंदकीत वाद सुरू आहे. यासंदर्भात प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. ज्या जागेसंदर्भात वाद आहे, त्यावर संतोष शहरकर मूर्ती घडविण्याचे काम २००७ पासून करतात. आपसात सुरू असलेल्या वादानंतर महापालिकेने याठिकाणी एकदा कारवाई करून त्यांचे मूर्तीचे शेड हटविण्यास सांगितले. त्यानंतर सदरचे शेड शहरकर यांनी स्वत:हून हटविले. यासंदर्भात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या सूचनेनुसार त्यांनी जाबजबाब लिहून दिले. हा प्रकार झाल्यानंतर शहरकर यांच्या बंधूंनी ती जागा अन्य एका राजकीय व्यक्ती आणि अन्य तीन जणांना परस्पर विकली. त्यासंदर्भातदेखील वाद न्यायालयात दाखल असताना ३० नोव्हेंबर रोजी महापालिकेच्या नाशिकरोड विभागाचे विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने याठिकाणी येऊन कारखान्याचे शेड काढण्यास सांगितले. त्यावेळी शहरकर हे नातलगाच्या लग्नाच्या निमित्ताने बाहेरगावी गेले होते. त्यांना कारागिरांनी हा प्रकार कळविल्यानंतर ते धावपळ करीत कारखान्यावर पोहोचले. सदरचे प्रकरण मुळातच न्यायप्रविष्ट असून महापालिकेने एकदा कारवाई केल्यानंतर आता संबंध येत नसल्याचे सांगितल्यानंतर अतिक्रमण विभागाने शहरकर आणि त्यांच्या पत्नीला पोलीस ठाण्यात डांबून ठेवले, असेही निवेदनात नमूद केले आहे.
न्यायालयाच्या आदेशाचा बहाणा
सदरच्या कारवाईच्या आधीदेखील मनपाच्या कर्मचाºयांनी शेड हटविण्यास सांगितले. तेव्हा शहरकर यांनी मनपात येऊन उपआयुक्तांची भेट घेतली. त्यावेळी प्रभारी अतिक्रमण उपआयुक्तांनी न्यायालयाच्या आदेशानुसार एकदा कारवाई झाली आणि पुन्हा कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सांगितले होते, मात्र त्यानंतरदेखील महापालिकेने कारवाई केल्याने या मागे भ्रष्टाचाराचा संशय शहरकर यांनी व्यक्त केला आहे.

Web Title:  Interested in removing private space encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.