न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप केला?; विरोधकांकडून कोंडी होताच माणिकराव कोकाटेंचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 15:05 IST2025-03-17T15:04:28+5:302025-03-17T15:05:16+5:30
कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली नाही तर ते अपात्र ठरतील आणि त्यामुळे पुन्हा निवडणुका घ्याव्या लागल्या, तर जनतेचा पैसा खर्च होईल असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप केला?; विरोधकांकडून कोंडी होताच माणिकराव कोकाटेंचा खुलासा
NCP Manikrao Kokate: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री माणिकराव कोकाटे यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेविषयी न्यायालयाने केलेली टिपण्णी सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. यावरून टीका-टिपण्णी होत असताना कोकाटी यांनी आपली बाजू मांडली आहे. "न्यायालयाने काही मतप्रदर्शन केले असेल तर त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. मी स्वतः कायद्याचा विद्यार्थी असल्याने विश्वास ठेवतो, विरोधक त्यावर टीका करीत असेल तर दुर्दैव आहे," असं मत कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केलं. त्याचबरोबर न्यायालयावर संघाचा दबाव असल्याचा दावा फेटाळून लावतानाच त्यांनी या सर्व कपोलकल्पीत कहाण्या असल्याचे मत व्यक्त केले.
कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार कोट्यातील सवलतीच्या दरातील सदनिका मिळवण्यासाठी आपल्या नावे कोणतीही मिळकत नसल्याची खोटी माहिती दिली, त्यामुळे २८ वर्षे जुन्या प्रकरणात नाशिकच्या न्यायालयाने कोकाटे यांना दोन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. त्यामुळे कोकाटे यांची आमदारकी धोक्यात आल्याने त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली. या न्यायालयाने कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. यासंदर्भातील आदेशात न्यायालयाने आपले निरीक्षण नोंदवले आहे. कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली नाही तर ते अपात्र ठरतील आणि त्यामुळे पुन्हा निवडणुका घ्याव्या लागल्या, तर जनतेचा पैसा खर्च होईल असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. त्यावर आता राजकीय वाद पेटला आहे. काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी न्यायालयाच्या निकालावर आश्चर्य व्यक्त केले आहे.
या सर्व टीकांसदर्भात नाशिकमध्ये अॅड. माणिकराव कोकाटे यांनी बोलताना न्यायालयाला जे वाटले त्यासंदर्भात त्यांनी मतप्रदर्शन केले आहे. जे त्यावर टीका करीत आहेत त्यांचा न्यायालयावर विश्वास नाही असे दिसते आहे, तर न्यायालयावर दबाव आहे असे म्हणणे चुकीचे असून, न्यायालयावर दबाव नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
दिघोळे न्यायालयात; १८ मार्चला सुनावणी
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात मूळ तक्रारदार माजी मंत्री दिवंगत तुकाराम दिघोळे यांची कन्या अंजली दिघोळे यांनी कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर १८ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.