जिंदाल कंपनीत बाहेरील लोकांचा हस्तक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 04:24 PM2019-02-16T16:24:51+5:302019-02-16T16:25:45+5:30
अधिकाऱ्यांचा आरोप : स्थानिकांना कंपनीचे सहकार्यच
घोटी : इगतपुरी तालुक्यातील शेकडो कुटुंबांना शाश्वत रोजगार पुरवत प्रकल्पग्रस्त, स्थानिक युवक, कामगार यांना वेळोवेळी सौजन्य करणा-या जिंदाल कंपनीत बाहेरील काही लोकांकडून अंतर्गत बाबींत मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप करण्याचे प्रकार वाढले असल्याचा आरोप मुंढेगाव ता. इगतपुरी येथील जिंदाल कंपनीच्या अधिका-यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे.
जिंदालचे अधिकारी संजय माथूर यांनी सांगितले, शासनाच्या निर्देशानुसार यापूर्वी शेकडो प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक नागरिकांना कामावर घेण्यात आलेले असून याबाबतची उर्वरित प्रक्रि या प्रगतीपथावर आहे. मुंढेगाव येथील स्थानिक, प्रकल्पग्रस्त युवकांना त्यांच्या कौशल्यावर आधारित कंपनीने परिपूर्ण रोजगार देण्याचा शब्दही पूर्ण केला आहे. काही बाबी तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित असल्या तरी त्या लवकरच पूर्णत्वाकडे जातील. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून जिंदाल कंपनीशी संबंधित नसलेल्या लोकांकडून अंतर्गत बाबींमध्ये मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप वाढला आहे. परिसरातील काही लोकांना हाताशी धरून काही लोक चांगल्या कामांत खोडा घालत आहेत. वर्षभरात जिंदालशी संबंधित नसलेले अनेक विषय घेऊन मोर्चे, निवेदने देऊन कंपनीचे खच्चीकरण करण्याचे हे कारस्थान आहे. कंपनीकडून नेहमीच रास्त मागण्यांबाबत सकारात्मक पाऊल उचलण्यात आले असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. इगतपुरी तालुक्यातील स्थानिक नागरिकांनी जिंदाल कंपनीला सहकार्य केल्यास आगामी काळात अधिकाधिक चांगले काम निश्चितपणे करता येणे शक्य आहे, असेही जिंदालचे अधिकारी संजय माथूर, तारक बॅनर्जी यांनी शेवटी सांगितले.
अनाठायी मागणी
जिंदाल कंपनीत काम करणा-या अधिकारी आणि कर्मचा-यांना निवासी व्यवस्था पुरवतांना मूलभूत सुविधा आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ह्या बाजारपेठेला बंद करून कंपनीबाहेरील व्यावसायिकांकडून साहित्य घ्यावे अशी अनाठायी मागणी आहे. कंपनीचे काम करणा-या लोकांना निवासी भागातच अत्यावश्यक सुविधा देणे हे आमचे कर्तव्य आहे. कंपनी बाहेरील स्थानिक व्यावसायिकांना पथदीप आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मानवतेच्या दृष्टीने करून देण्यात आलेली असून संबंधितांची विजेची जोडणी, शॉप अॅक्ट परवानगी वगैरे विषय जिंदालशी संबंधित नसल्याचेही माथूर आणि बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.