‘धरती के तारे’ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:12 AM2017-07-24T00:12:17+5:302017-07-24T00:12:32+5:30
मालेगाव : येथील मॉलिवूडचे मुकीम मीनानगरी आणि नदीम मीनानगरी यांच्या ‘धरती के तारे’ या शॉर्ट फिल्मला आंतरराष्ट्रीय दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अर्वार्डने शनिवारी मुंबई येथे गौरविण्यात आले
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : येथील मॉलिवूडचे मुकीम मीनानगरी आणि नदीम मीनानगरी यांच्या ‘धरती के तारे’ या बालमजुरीविरोधातील शॉर्ट फिल्मला आंतरराष्ट्रीय ९ वा दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अर्वार्डने शनिवारी मुंबई येथे गौरविण्यात आले. मुंबईच्या जुहू येथील इस्कॉन आॅडोटोरिअममध्ये केंद्रीय समाज कल्याणमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाहीद पठाण या आठ वर्षाच्या मुलाने बाल कामगाराची भूमिका केली आहे. चित्रपटात त्याचा हात कापला गेल्याचे दाखविण्यात आले असून शाहीदच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे संवाद नदीम मीनानगरी यांनी लिहिले असून गीत लेखन अर्शद मीनानगरी यांनी केले आहेत. एएमएन प्रोडक्शन इंटरनॅशनल या बॅनरखाली निर्माता अलीम ताहीर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. यात मुकीम मीनानगरी, नदीम मीनानगरी, भुषण पगार, रफीक निसार, फैमिदा अन्सारी, अजीम शेख यांनी भूमिका केली आहे. कार्यक्रमास व्यासपीठावर शिक्षणमंत्री विनोद तावडे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, नाशिकच्या महापौर रंजना भानसी उपस्थित होते. मराठी अभिनेते विक्रम गोखले, महेश कोठारे, मकरंद अनासपुरे, निशिगंधा वाड, वर्षा उसगावकर उपस्थित होते.
नॉमिनेशनसाठी आठ शॉर्ट फिल्मस होत्या. त्यातून ‘धरती के तारे’ या शॉर्टफिल्मची पुरस्कारासाठी निवड झाली. आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये आॅस्ट्रेलिया, जर्मनी, बांगलादेश, स्कॉटलॅण्ड, साऊथ आफ्रिका, तुर्की या देशातील शॉर्ट फिल्मसचा सहभाग होता.