आरोग्य विद्यापीठातर्फे आंतरराष्टÑीय शैक्षणिक केंद्र : डॉ. दिलीप म्हैसेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 01:03 AM2018-06-10T01:03:42+5:302018-06-10T01:03:42+5:30
नाशिक : विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन कार्यक्रमांना जागतिकदृष्ट्या चालना देण्यासाठी विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्र स्थापन केले आहे. परदेशात या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शिक्षण, संशोधन अशा संधी उपलब्ध होण्यासाठी २० देशांतील विद्यापीठांशी आंतरराष्ट्रीय करार लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी दिली. विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्यानिमित्ताने त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.
नाशिक : विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन कार्यक्रमांना जागतिकदृष्ट्या चालना देण्यासाठी विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्र स्थापन केले आहे. परदेशात या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शिक्षण, संशोधन अशा संधी उपलब्ध होण्यासाठी २० देशांतील विद्यापीठांशी आंतरराष्ट्रीय करार लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी दिली. विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्यानिमित्ताने त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.
आरोग्यदायी जीवनासाठी योगसाधनेचे वाढते महत्त्व लक्षात घेता योग शिक्षणाच्या प्रसारासाठी केंद्र सरकारच्या आयुष विभागासोबत करार करून आरोग्य विज्ञानातील सर्व पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून, योगशास्त्राचा पदव्युत्तर अभ्यासक्रमही सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे कुलगुरू म्हैसेकर म्हणाले. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून सुरू होऊन राज्यात वैद्यकीय शिक्षणाच्या १०० जागा वाढल्याचेही त्यांनी सांगितले.
जलद गतीने व पारदर्शक पद्धतीने विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्याच्या अनुषंगाने परीक्षाविषयक कामकाजात आॅनलाइन प्रणालीचा अंतर्भाव करून प्रात्यक्षिक परीक्षा तसेच अंतर्गत मूल्यमापनाचे गुण आॅनलाइन पद्धतीने विद्यापीठास पाठविण्याची प्रणाली विकसित करण्यात आली आहे. तसेच विद्यापीठाने कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘ई-पेमेंट गेटवे’ ही आॅनलाइन शुल्क अदा करण्यासाठी आवश्यक प्रणाली तयार केली असून विद्यापीठाच्या वर्धापन दिनापासून या सुविधेचा लाभ सर्व संबंधितांना घेता येऊ शकेल, असेही ते म्हणाले.
पीएचडीसाठी आॅनस्क्रीन मूल्यांकन
विद्यापीठांतर्गत पदव्युत्तर पदवी व पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रबंध आॅनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येतात व त्यांचे मूल्यांकनदेखील आॅनस्क्रीन पद्धतीने करण्यात येते. हे तंत्रज्ञान वापरणारे भारतातील एकमेव विद्यापीठ आहे, असेही ते म्हणाले.
रुग्ण-डॉक्टर संवाद
हल्ली रुग्णालये व डॉक्टरांवरील हल्ल्याचे प्रमाण वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर रुग्ण-डॉक्टर यांच्यातील संवाद वाढविण्यासाठी, गैरसमजाचे प्रसंग टाळण्यासाठी संवाद कौशल्य या विषयाचा वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
संशोधन नियतकालिक लवकरच
विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील संशोधकांना आपले संशोधन साहित्य प्रकाशित करण्यासाठी विद्यापीठाचे पहिले संशोधन नियतकालिक एमयूएचएस हेल्थ सायन्स रिव्ह्यू लवकरच प्रकाशित होत आहे. त्याबाबतची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली असल्याचेही डॉ. म्हैसेकर यानी सांगितले.