युरेशिया आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘इन सर्च आॅफ विठ्ठल’ लघुपटाला आंतरराष्ट्रीय सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:00 AM2017-11-29T00:00:19+5:302017-11-29T00:30:49+5:30
रशियन फेडरेशन, मॉस्को संस्थेतर्फे लॉस एंजेलिस येथे आयोजित करण्यात आलेल्या युरेशिया आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये नाशिकच्या ‘इन सर्च आॅफ विठ्ठल’ या मराठमोळ्या लघुपटाला ‘बेस्ट डॉक्युमेंटरी’ या विभागात सन्मानित करण्यात आले आहे.
नाशिक : रशियन फेडरेशन, मॉस्को संस्थेतर्फे लॉस एंजेलिस येथे आयोजित करण्यात आलेल्या युरेशिया आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये नाशिकच्या ‘इन सर्च आॅफ विठ्ठल’ या मराठमोळ्या लघुपटाला ‘बेस्ट डॉक्युमेंटरी’ या विभागात सन्मानित करण्यात आले आहे. पंढरपूर वारी या विषयावर साकारलेल्या या लघुपटात प्रत्येकाचा आपल्या आत्मशोधावर आधारित असलेल्या प्राजक्त देशमुख यांच्या मुक्त काव्याच्या आधारे तसेच वारीतल्या विविध दृश्यांची गुंफण करून हा अनोखा अनुभव लघुपट साकारण्यात आला आहे. उत्तम छायाचित्रकार असलेला अभिषेक कुलकर्णी आणि मराठी रंगभूमीवरील कलाकार प्राजक्त देशमुख ही जोडगोळी लघुपट क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करत असून, ‘इन सर्च आॅफ विठ्ठल’ हीदेखील अशीच एक वेगळी निर्मिती आहे. वेळेनुसार विभागणी करून दिलेल्या विजेत्यांच्या गटात चाळीस मिनिटातल्या श्रेणीत या लघुपटाला विजयी घोषित करण्यात आले. या चित्रपटाला आनंद ओक यांनी संगीतसाथ दिली असून, ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी यांच्या स्वरात या लघुपटातील संवाद गुंफण्यात आले आहेत.
दिग्दर्शक म्हणून प्रत्येक पुरस्कारासोबत जबाबदारी वाढत चालली असून, पुढचं काम आणखी उंचीवर नेण्याचं दडपण आहे. प्राजक्त आणि मी अनेक विषयांवर चर्चा करीत असतो. लवकरच एक नव्या लघुपटाला आम्ही सुरुवात करणार आहोत. विठ्ठलाचा शोध आम्हाला वेगवेगळे सन्मान मिळवून देतोय, हे खूप आनंददायी आहे. - अभिषेक कुलकर्णी (दिग्दर्शक, छायांकन)
आम्ही या लघुपटासाठी प्रचंड मेहनत घेतली असून, वर्षभरानंतरही त्याला विविध सन्मान मिळाले. गेल्यावर्षी राष्ट्रीय पुरस्कार पटकावल्यानंतर आता मिळालेल्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारामुळे नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचले ही अभिमानाची गोष्ट आहे.
- प्राजक्त देशमुख (लेखक, पटकथा)