आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:16 AM2021-05-21T04:16:32+5:302021-05-21T04:16:32+5:30
नाशिक : नाशिकच्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक मोनाली मनोहर गोऱ्हे (४४) यांचे गुरुवारी (दि. २०) सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ...
नाशिक : नाशिकच्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक मोनाली मनोहर गोऱ्हे (४४) यांचे गुरुवारी (दि. २०) सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यापूर्वी केवळ काही तास आधी पहाटे मोनालीचे वडील मनोहर गोऱ्हे (७३) यांचेदेखील निधन झाले होते. वडिलांपाठाेपाठ मुलीचे निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मोनाली यांनी प्रख्यात मानसतज्ज्ञ आणि माजी पोलीस महासंचालक भीष्मराज बाम यांच्या मार्गदर्शनाखाली नेमबाजीचे प्राथमिक शिक्षण घेतले होते. त्यानंतर स्वकर्तृत्त्वावर राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदके मिळवल्यानंतर त्यांनी सातपूरला एक्सेल शूटिंग नावाने नेमबाजी प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली. गत दशकभराहून अधिक काळापासून मोनाली त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत नाशिकच्या युवा खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचे कार्य करीत होत्या. दरम्यानच्या काळात मोनाली यांनी प्रशिक्षक म्हणून भारताच्या युवा संघासमवेत अनेक स्पर्धांमध्ये सहायक प्रशिक्षक म्हणून कर्तव्य पार पाडले होते. तसेच गत पाच वर्षांपासून त्या श्रीलंकेच्या राष्ट्रीय संघालादेखील प्रशिक्षण देत होत्या. आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक म्हणूनदेखील त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले होते. त्यांच्या पश्चात आई आणि एक विवाहित बहीण आहे.
इन्फो
वडिलांचे पहाटे निधन
मोनालीचे वडील आणि जिल्हा परिषदेचे माजी कर्मचारी मनोहर गोऱ्हे यांचे पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. इंदिरानगरच्या जिल्हा परिषद कॉलनीतील रहिवासी आणि श्री दत्तगुरु सेवा संस्थानचे उपाध्यक्ष असलेल्या गोऱ्हे यांचा सामाजिक कार्यातही पुढाकार होता. वडिलांपाठोपाठ कन्या मोनालीचेही निधन झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.
फोटो
२०मोनाली गोऱ्हे
२०गोऱ्हे मनोहर