नाशकात आंतरराष्ट्रीय योग दिन डिजिटल पद्धतीने साजरा ; शैक्षणिक संस्थांचाही ऑनलाईन सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 06:58 PM2020-06-21T18:58:58+5:302020-06-21T19:06:23+5:30
नाशिककरांनी रविवारी (दि.२१)आपआपल्या घरातच विविध प्रकारची योगासने करून आंतराराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत सूर्यनमस्कार, ताडासान, कपालभाती सारख्या विविध आसनांची प्रात्यिक्षिके केली. या माध्यमातून करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिन डिजिटली साजरा करण्याच्या सरकारच्या आवाहनाला नाशिककरांनी रविवारी (दि.२१) उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
नाशिक : करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिन डिजिटली साजरा करण्याच्या सरकारच्या आवाहनाला नाशिककरांनी रविवारी (दि.२१) उत्स्फूर्त प्रतिसाद देतआपआपल्या घरातच विविध प्रकारची योगासने करून प्रतिसाद दिला. तर विविध व्यायाम शाळा आणि योग प्रशिक्षण वर्गांच्या माध्यमातून सोशल डिस्टंन्सींगचे पालन करून आंतराराष्ट्रीय योग दिनाचे औचित्यसाधत सूर्यनमस्कार, ताडासान, कपालभाती सारख्या विविध आसनांची प्रात्यिक्षिके करून घेतली.
करोनामुळे मोठ्या संख्येने एकत्र येणे शक्य होणार नसल्याने लोकांनी ‘सोशल मीडिया’तून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. जिल्हा क्रीडा विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन योगाभ्यास शिबीरात जिल्हा भरातील क्रीडा शिक्षकांनी सहभागी होत वेगवेगळया योगासनांची प्रात्यक्षिक केली. यात जिल्हाभरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याचे दिसून आले. तर काही शिक्षण संस्थांनी स्वतंत्र वेबलिंकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योगासानांचे धडे दिले. त्याचप्रमाणे महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्तालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, विभागीय आयुक्तलाय आदी विविध कार्यालयातील प्रमुख अधिकाºयांनीही घरीच राहून योगाभ्यास केला. अनेक योगाभ्यासकांनी त्यांनी केलेल्या योगासनांचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल केले असून यंदा एकत्र येण्यावर निर्बंध असल्याने एकत्र योग दिनाच्या उत्साहात कोणत्याही प्रकारे घट झाल्याचे जाणवले नाही. दरम्यान, शहरात आंतराष्ट्रीय योग दिवसासाठी ‘योग घरी आणि योग कुटुंबासोबत’ अशी संकल्पना मांडण्यात आली होती. त्यामुळे रविवारी (दि.२१) सकाळी ७ वाजल्यापासून ‘सोशल मीडिया’तून अनेक नाशिकरांनी विविध ठिकाणी आयोजित ऑनलाईन योग शिबिरांमध्ये सहभाग नोंदवला. डिजिटल माध्यमांमध्ये अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे,यासाठी शहरातील वेगवेगळ्योग प्रशिक्षण संस्थांनी गेल्या आठवड्याभरापासूनच प्रचार प्रसाराची मोहीम हाती घेतली होती. विशेष म्हणजे अशा प्रकारे ऑनलाईन शिबिरांमध्ये काही परदेशातील योगाभ्यासकांनी सहभाग नोंदविल्याचे दिसून आले.
मुक्त विद्यापीठात योगासानांविषयी मार्गदर्शन
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून योगासानांविषयी मार्गदर्शनपर ऑनलाईन व्याख्यान व प्रात्यक्षिकांच सादरीकरण करण्यात आले. विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने हा योगदिन साजरा केला. यावेळी कुलगुरू प्रा ई. वायूनंदन ,आरोग्य विज्ञान विद्यशाखेचे संचालक डॉ. जयदीप निकम यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. विविध विद्याशाखांचे संचालक व इतर कर्मचारी अशा ५० योगाभ्यासकांनी या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते. योगतज्ज्ञ मोकळ यांनी प्रात्यक्षिक सराव सादर करून घेतला.