आंतरराष्ट्रीय स्तरावर पैठणी दुर्लक्षित
By admin | Published: July 8, 2017 11:01 PM2017-07-08T23:01:16+5:302017-07-08T23:04:05+5:30
येवला : ‘टेक्सटाइल इंडिया २०१७ या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात दुर्लक्षपणामुळे पैठणीचा स्टॉलही लागू शकला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : वस्त्रोद्योग खात्याच्या वतीने गुजरातमधील गांधीनगरात नुकत्याच भरलेल्या ‘टेक्सटाइल इंडिया २०१७ या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात मुंबई येथील बुनकर सेवा केंद्राच्या दुर्लक्षपणामुळे साता समुद्रापार नाव असलेल्या पैठणीचा स्टॉलही लागू शकला नाही. तर प्रदर्शनात रॅम्प वॉकवर पैठणीच्या नावाखाली ताना साडीचे प्रदर्शन करण्यात आल्याने पैठणी निर्मिती करणाऱ्या व या प्रदर्शनाला निमंत्रितांमध्ये उपस्थित असलेल्या पुरस्कार प्राप्त पैठणी विणकरांमध्ये तीव्र नाराजीचा सूर प्रदर्शनानंतर उमटला आहे. महाराष्ट्राच्या महावस्त्राची अवहेलना झाल्याचे येवल्यातील अनेक विणकरांना खटकले.
गुजरातमधील गांधीनगर येथील महात्मा मंदिराच्या भव्य मैदानावर वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने ‘टेक्सटाइल इंडिया २०१७’ हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाला पैठणी उत्पादन करणाऱ्या येवले शहरातून आठ तर पैठण येथील दोन पुरस्कार प्राप्त विणकरांना बुनकर सेवा केंद्राच्या वतीने खास निमंत्रित करण्यात आले होते. देशभरातून सुमारे ५०० पुरस्कार प्राप्त कुशल तज्ज्ञ व विणकर या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाला उपस्थित होते. प्रदर्शनास धागा निर्मितीपासून कापड निर्मिती, आधुनिक तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके, हातमागाची प्रात्यक्षिके यांसह विदेशातील धागा उत्पादकांशी विणकरांचा संवाद ठेवण्यात आला. तीन दिवसांच्या या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात हातमागावर तयार होणाऱ्या उत्पादनांच्या प्रदर्शनासाठी रॅम्प वॉकचेही आयोजन करण्यात आले होते. या रॅम्प वॉकमध्ये पैठणीच्या नावाखाली रॅम्प वॉकवर चालणाऱ्या मॉडेल्सनी ताना साड्यांचे प्रदर्शन केले. यावेळी प्रदर्शनाला उपस्थित असलेले पैठणी विणकर रमेश परदेशी, पंकज पहिलवान, राजेंद्र नागपुरे, वामन वाडेकर, जितेंद्र पहिलवान, नितीन नाकोड, पैठण येथील मदन डालकरी, लायकभाई, नाशिक येथील विजय डालकरी हे पैठणी विणकर अचंबित झाले. आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात पैठणीसारख्या जगविख्यात हातमागावर तयार होणाऱ्या कलेचा आविष्कार जगभरातून आलेल्या पर्यटकांसमोर दाखविण्याची संधी असताना केवळ बुनकर सेवा केंद्राच्या दुर्लक्षपणामुळे पैठणीला चालून आलेली ही संधी गमवावी लागल्याचे दु:ख मात्र प्रदर्शनाला उपस्थित असलेल्या पुरस्कार प्राप्त पैठणी विणकरांच्या चेहऱ्यावर दिसून आले.