ग्रंथांऐवजी इंटरनेट, मोबाइल झाले तरुणांचे गुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 12:25 AM2019-04-23T00:25:04+5:302019-04-23T00:25:53+5:30
ग्रंथ हा असा खजिना आहे की, ज्याच्यामुळे वाचक समृद्ध होतो. तसेच ग्रंथ मानवी आयुष्याला दिशा देण्याचे काम करतात. त्यामुळे ग्रंथ हेच खरे गुरू असल्याचे म्हटले जाते. परंतु सध्याच्या व्हॉट्सअॅप आणि फेसबुक यांसारख्या सोशल मीडियामुळे ग्रंथांऐवजी मोबाइल, इंटरनेट तरुणांचे गुरू झाल्याचे दिसून येत असून, वाचनालयाकडे मुलांचा व तरुणाईचा ओढा कमी झाला आहे.
पुस्तक दिन विशेष
नाशिक : ग्रंथ हा असा खजिना आहे की, ज्याच्यामुळे वाचक समृद्ध होतो. तसेच ग्रंथ मानवी आयुष्याला दिशा देण्याचे काम करतात. त्यामुळे ग्रंथ हेच खरे गुरू असल्याचे म्हटले जाते. परंतु सध्याच्या व्हॉट्सअॅप आणि फेसबुक यांसारख्या सोशल मीडियामुळे ग्रंथांऐवजी मोबाइल, इंटरनेट तरुणांचे गुरू झाल्याचे दिसून येत असून, वाचनालयाकडे मुलांचा व तरुणाईचा ओढा कमी झाला आहे. तरुणाईचा पुस्तकांऐवजी मोबाइल व अन्य साधनांकडे कल वाढल्याने स्मार्टफोनच्या युगात शहरातील सार्वजनिक वाचनालयात ज्येष्ठ नागरिकांचीच वर्दळ अधिक दिसून येते.
वाचनालयात नव्या पिढीचे दर्शन फारच दुर्मीळ झाले आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या अनेक उमेदवारांना विविध विषयांवरील पुस्तकांचा आढावा घ्यावा लागतो. यासाठी लागणारी पुस्तके सहज उपलब्ध होत असतात. तरीही या सोशल मीडियाच्या दुनियेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मोजकीच मुले वाचनालयाची वाट चोखाळताना पहायला मिळत आहे. जे काही पुस्तकांचा वापर करतात त्यात बहुतांश तरुण खासगी करिअर अकॅडमीच्या मार्गाने अभ्यास करतात.
त्यामुळे आजच्या तरुणांनी वाचनालयांकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. पूर्वी उन्हाळ्याची सुट्टी म्हटली की खेळ खेळणे, मामाच्या गावाला जाणे, मौजमस्ती करणे, पोहणे, सायकल चालवायला शिकणे, दिवसातून तासभर वेळ काढून वाचनालयात जाऊन कादंबरी, महापुरुषांच्या कथा वाचन करणे आदी कार्यक्रम ठरलेले असायचे. पण काळानुरूप यात बदल झाला. संगणक व मोबाइलचे युग आले. मुले तासन्तास मोबाइलचा वापर करू लागली. याशिवाय टीव्ही, नेट कॅफेवर अनेक मुले बसलेले दिसून येतात. त्यामुळे वाचनालयाकडे येणारी तरुण पिढीची पावले आता सायबर कट्ट्यावर स्थिरावल्याने ‘वाचाल तर वाचाल’ ही संस्कृतीच आता काळाच्या ओघात मागे पडते की काय अशी चिंता ज्येष्ठ नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
ज्येष्ठांकडून चिंता
एके काळी ज्ञानाचा विस्तार करण्याचे केंद्र म्हणून वाचनालयाची ओळख होती. यात दिवसभर युवकांची गर्दी पहायला मिळत असे. परंतु स्मार्टफोनच्या युगात या वाचनालयात उतारवयातील लोक दिसतात. नवीन पिढी वाचनाला फारसे महत्त्व देत नसल्यामुळे वाचन संस्कृती हरपत चालल्याची चिंता ज्येष्ठांकडून व्यक्त होत आहे.
वाचनालयात येणाºया वाचकांपैकी ज्येष्ठ नागरिकांची सख्या अधिक असून रंजक कथा, कादंबऱ्यांना ज्येष्ठ नागरिकांकडून पसंती मिळते. यात प्रामुख्याने चरित्र ग्रंथ वाचणाºया तरुणांसोबतच काव्यसंग्रह आणि ऐतिहासिक पुस्तकांना मागणी अधिक असते. - नितीन बोरसे, ग्रंथपाल, सार्वजनिक वाचनालय, नाशिक
नियमित ग्रंथालयात येऊन पुस्तके वाचणाºयांपैकी ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. तुलनेत तरुणांची संख्या कमी असली तरी काही साहित्यप्रेमी तरुणही आवर्जून आपल्या आवडीची पुस्तके निवडून घेण्यासाठी नियमित येतात. सध्या वाचकांची सस्पेंस कादंबºयांना अधिक पसंती आहे. इतर रंजक कथा, कादंबºया, काव्यसंग्रहांचीही वाचकांकडून मागणी होत आहे. मात्र आध्यात्मिक आणि धार्मिक ग्रंथांची मागणी करणारे वाचक तुलनेत खूपच कमी आहे.
- योगीता भांबरे, ग्रंथपाल, नाशिक