कारमधून रोकड लांबविणारी आंतरराज्यीय टोळी इंदोरमधून जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 07:24 PM2020-11-04T19:24:45+5:302020-11-04T19:27:02+5:30
महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या राज्यांत या टोळीचा धुमाकूळ होता. या राज्यांतील विविध शहरांमध्ये यांच्याविरुध्द जोरी, जबरी चोरी, लूटीचे गुन्हे दाखल आहेत.
नाशिक : पाळत ठेवून रोकड घेऊन जाणाऱ्या कारचालकांचे लक्ष विचलित करुन त्यांच्या कारमधून रोकडची बॅग घेत पळ काढणारी आंतरराज्यीय टोळी मध्यप्रदेशमधील इंदुर शहरातून गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाने सापळा रचून जेरबंद केली. एकूण आठ चोरट्यांच्या मुसक्या बांधण्यास पोलिसांना यश आले असून त्यांच्याकडून इनोव्हा कारदेखील जप्त करण्यात आली आहे.
मागील महिन्यात सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतील एम.जी.रोडवर सेवानिवृत्त उपसंचालक रामचंद्र जाधव (रा.बोधलेनगर) यांची दिशाभूल करुन त्यांच्या कारमधून एक लाख रुपयांच्या रोकड असलेली दोन बॅगा घेऊन चोरटे भरदिवसा पसार झाले होते. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु होता. गुन्हे शाखा युनीट-१चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक आनंदा वाघ, सहायक निरिक्षक महेश कुलकर्णी यांना या गुन्ह्यातील संशयित दिल्ली येथील असल्याची माहिती मिळाली. त्यांच्यावर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले असता, ते पुन्हा दिल्ली येथून रविवारी नाशकात चोरीच्या उद्देशाने येत तेथून पुढे मध्यप्रदेश राज्यात पसार होणार असल्याची खात्रीशिर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वाघ यांनी पथक तयार करुन इंदुरला रवाना केले. इंदुरमध्ये दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तेथील हॉटेल लॉजमधे झाडाझडती घेत महु जिल्ह्यातील बंजारी गावातून संशयित कांगत्रम सैल्ली दुराई, पवन मोहनलाल, आकाश मोहनलाल, मनतोश अली उर्फ मुत्तु, मरियप्पा काली बाबू, विनोद राजेंद्र, साहील सुरेश तसेच त्यांचा एक अल्पवयीन साथीदार अशा आठ संशयित अट्टल चोरट्यांच्या टोळीला बेड्या ठोकल्या. त्यांच्या ताब्यातील इनोव्हा कार (एच.आर २६. बीआर ९०४४) जप्त केली. त्यांच्या ताब्यातून सात मोबाइल, दोन मिरची स्प्रे, एक रबरी गलोल, ५० लोखंडी छर्रे, ७० हजारांची रोकड असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या राज्यांमध्ये होता 'गँग'चा धुमाकूळ
महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या राज्यांत या टोळीचा धुमाकूळ होता. या राज्यांतील विविध शहरांमध्ये यांच्याविरुध्द जोरी, जबरी चोरी, लूटीचे गुन्हे दाखल आहेत. लॉकडाऊननंतर ही टोळी नाशिक, पुणे, मुंबई, ठाणे, इंदुर, अहमदाबाद, दिल्ली या शहरांकडे वळाल्याचे निशाणदार यांनी सांगितले. या सात संशयितांना न्यायालयाने येत्या सोमवारपर्यंत (दि.९) पोलीस कोठडी सुनावली आहे. जाधव यांची रोकड लांबविल्याची कबुलीही चोरट्यांनी दिली आहे. त्यांच्याकडून अजून काही गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.