आंतरराज्य टोळीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 11:12 PM2018-10-13T23:12:11+5:302018-10-14T00:13:56+5:30
खोदकामात सोने सापडले असून, ते स्वस्त भावात देण्याचे आमिष दाखवून बनावट सोने विकून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील तिघा संशयिताना आडगाव पोलिसांनी सापळा लावून अटक केली़
नाशिक : खोदकामात सोने सापडले असून, ते स्वस्त भावात देण्याचे आमिष दाखवून बनावट सोने विकून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील तिघा संशयिताना आडगाव पोलिसांनी सापळा लावून अटक केली़ लाला किसन सोळंकी (४२, रा. अहमदाबाद, गुजरात), दिलीप अशोक चव्हाण (२४, रा. आडगाव शिवार) व सुभाष चैतराम मोहिते (२४) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून, त्यांचा साथीदार फरार झाला आहे़
आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी दिलेल्या माहितीनुसार तपोवन येथील तरुणास दोन दिवसांपूर्वी चार संशयित भेटले़ घराचे खोदकाम करताना सोने सापडले असून, ते २० हजार रुपये तोळ्याप्रमाणे विक्री करायचे आहे, असे सांगितले़ या तरुणाने सोने दाखविण्याची विनंती केली असता त्यांनी माळेतील एक सोन्याचा मणी काढून दाखविला़ यावरून तरुणाने बाकीचे सोने दाखवा व किमत जास्त असल्याचे सांगितले असता १५ हजार व त्यानंतर दहा हजार रुपये तोळ्याने देण्यास तयार झाले़ या तरुणास संशय आल्याने त्याने पोलीस शिपाई दशरथ पागी यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली़ गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक दिनेश मुळे, पोलीस हवालदार मुनीर काझी, पोलीस नाईक विजय सूर्यवंशी, विनोद लखन, दशरथ पागी, मनोज खैरे यांनी आडगाव शिवारात सापळा रचला.
संशयित सोने विक्रीसाठी टीव्हीएस कंपनीच्या दुचाकीवरून (एमएच १५, सीएफ ६७७२) आले असता पोलिसांनी या तिघांनी शिताफीने अटक केली़ यावेळी दुसºया दुचाकीवरून आलेला चौथा संशयित अंधाराचा फायदा घेत पसार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे़ पोलिसांनी या तिघा संशयितांकडून बनावट सोने व दुचाकी जप्त केली आहे़