मुलाखतीतून भाजपचे चित्र होणार स्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 01:46 AM2019-09-03T01:46:18+5:302019-09-03T01:46:40+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती होणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत असले तरी, बुधवारी नाशिक जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचे भारतीय जनता पक्षाने ठरविले असून, त्यादृष्टीने इच्छुकांनी ‘होमवर्क’ करायला सुरुवात केली आहे.
नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती होणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत असले तरी, बुधवारी नाशिक जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचे भारतीय जनता पक्षाने ठरविले असून, त्यादृष्टीने इच्छुकांनी ‘होमवर्क’ करायला सुरुवात केली आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, पक्षाकडून इच्छुक असलेल्या प्रत्येकालाच ‘आमदारकीची’ स्वप्ने पडत असल्याने या मुलाखतीच्या निमित्ताने पक्षाबरोबरच इच्छुकांनाही मतदार-संघातील स्वपक्षीय प्रतिस्पर्ध्यांचे चित्र स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती न करता जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघांत भारतीय जनता पक्षाने उमेदवार उभे केले असता, त्यातील चार उमेदवार निवडून आले आहेत. या चारमध्ये तीन आमदार एकट्या नाशिक शहरातील असून, एक जागा चांदवड मतदारसंघातील पटकावली आहे. मात्र गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलली. एवढेच नव्हे तर लोकसभा निवडणुकीत युतीने जिल्ह्णातील दोन्ही जागा जिंकल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या अपेक्षा अधिक उंचावल्या असल्या तरी, राजकीय नेत्यांच्या पक्षांतरात भारतीय जनता पक्षाच्या वाट्यास जिल्ह्णातून फारसे काही हाती लागलेले नाही. अशा परिस्थितीतही भाजपकडून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची संख्या अधिक असून, युतीच्या जागा वाटपात सेनेच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघातूनही भाजपा इच्छुकांची संख्या अधिक आहे. तर भाजपाच्याच ताब्यात असलेल्या मतदारसंघातही चार ते पाच इच्छुक तयार आहेत. परिणामी उमेदवारी देताना इच्छुकांबरोबर पक्षश्रेष्ठींचीही कसोटी लागणार आहे. निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वीच इच्छुकांकडून विद्यमान आमदारांच्या कामकाजाविषयी असमाधान व्यक्त करून स्वत:ची दावेदावी दामटण्यास सुरुवात झाली आहे.
पक्षाने येत्या बुधवारी नाशिक जिल्ह्यातील सर्वच्या सर्व पंधरा विधानसभा मतदारसंघांत उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी इच्छुकांनी मुलाखतीची तयारी सुरू केली असून, प्रतिस्पर्ध्यावर लक्ष ठेवून आहेत. शिवसेनेबरोबर युती करून भाजप निवडणूक लढविणार असल्याने पंधरा मतदारसंघात इच्छुकांची चाचपणी का? असा सवाल शिवसेनेनेही उपस्थित करण्यास सुरुवात केली असून, भाजपच्या मुलाखतीतून खऱ्या अर्थाने मतदारसंघनिहाय इच्छुकांची संख्या व जागावाटपात संभाव्य मतदारसंघ सुटण्याविषयीचे चित्र स्पष्ट होणार आहे.