मुलाखतकार गाडगीळ यांच्या किश्शांमध्ये नाशिककर लोटपोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 01:40 AM2018-06-04T01:40:20+5:302018-06-04T01:40:20+5:30
नाशिक : आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, पु़ ल़ देशपांडे, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक दिग्गजांचे विनोदी किस्से हुबेहूब त्यांच्याच आवाजात सांगत प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी रविवारी (दि़३) नाशिककरांना मनमुराद हसवले़ निमित्त होते कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने कुसुमाग्रज स्मारकात आयोजित ‘मुलाखतकाराची मुलाखत’ या कार्यक्रमाचे़ या मुलाखतीतून गाडगीळ यांनी आपला जीवनप्रवास तर उलगडलाच शिवाय आपल्या हजरजबाबीपणाबरोबरच इतरही गुणांचे दर्शनही घडविले़
नाशिक : आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, पु़ ल़ देशपांडे, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक दिग्गजांचे विनोदी किस्से हुबेहूब त्यांच्याच आवाजात सांगत प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी रविवारी (दि़३) नाशिककरांना मनमुराद हसवले़ निमित्त होते कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने कुसुमाग्रज स्मारकात आयोजित ‘मुलाखतकाराची मुलाखत’ या कार्यक्रमाचे़ या मुलाखतीतून गाडगीळ यांनी आपला जीवनप्रवास तर उलगडलाच शिवाय आपल्या हजरजबाबीपणाबरोबरच इतरही गुणांचे दर्शनही घडविले़
देशातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या तब्बल चार हजार मुलाखती, सात हजार कार्यक्रमांचे निवेदन गाडगीळ यांनी केले आहे़ गत ४५ वर्षांपासून अव्याहतपणे सुरू असलेल्या प्रवासात त्यांनी राजकारणी, सिनेमा, नाटक, गायक, संगीत, उद्योग, क्रीडा यांसह विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या मुलाखती घेतल्या आहेत़ अपर्णा क्षेमकल्याणी यांनी विचारलेल्या प्रश्नांना गाडगीळ यांनी दिलखुलासपणे उत्तरे देत आपला जीवनप्रवास उलगडला़ शब्दांचा खेळ जमेल का? याची गोडी कशी लागली या प्रश्नावर गाडगीळ यांनी सांगितले की, पुण्याच्या सदाशिव पेठेत लहानाचे मोठे होत असताना आजी-आजोबांसमवेत कथाकथन, कीर्तने, प्रवचने तसेच आचार्य अत्रे, पु़ ल़ देशपांडे यांना ऐकायला मिळाले. शब्दांची गोडी लागली व त्यांचा प्रभावही पडला़
गाडगीळ यांनी सांगितले की, पुलंकडून गप्पा मारत संवाद साधण्याची शैली तर आचार्य अत्रेंकडून शब्दांची मांडणी व आत्मविश्वास घेतला़ याबरोबरच जीवनात भेटणाऱ्या प्रत्येकाकडून काही ना काही शिकत गेलो. पुस्तके आणि माणसेही वाचत गेलो़ महाविद्यालयीन शिक्षणानंतर वडिलांनी नोकरीचा सल्ला दिला मात्र नोकरीतील पगाराइतकेच पैसे दरमहा कमविन, यामध्ये एक रुपयाही कमी मिळाला तर तुमचा सल्ला ऐकेल, असे सांगितले़ महाविद्यालयीन कार्यक्रमात निवेदन करण्याची संधी मिळाली व आत्मविश्वास वाढला़ सुरुवातीला पत्रकारिता, रेडिओ, टीव्हीवरील कार्यक्रम, जाहिराती अशी कामे पहाटे चार ते रात्री बारा वाजेपर्यंत सतत सात वर्षे केली़ ग़ दि. माडगूळकर व संगीतकार बाबुजी यांच्या कार्यक्रमात निवेदन करण्यापूर्वी सर्व इतिहास माहीत करून घेतला़
गाण्याची दैवतं असलेल्या पाचही मंगेशकर भावंडांची मुलाखत घेण्याचे भाग्य मिळाले. नम्रता, उत्सुकता, आदर व साध्या सोप्या भाषेतील प्रश्न यामुळे सुपरस्टार अमिताभ बच्चन, बाळासाहेब ठाकरे, माधुरी दीक्षित, शरद पवार या दिग्गजांच्या मुलाखती घेण्याचे भाग्य मिळाले़
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संजय पाटील, विश्वस्त विनायक रानडे यांनी मान्यवरांचा सत्कार केला़ प्रास्ताविक तन्वी अमित यांनी केले़ प्रारंभी गाडगीळ यांच्या कार्याबाबत दहा मिनिटांची चित्रफीत दाखविण्यात आली़ या कार्यक्रमास नाशिककरांनी मोठी गर्दी केली होती़
आमची पंचविशी, वलयांकित, मुखवटे चेहरे, मुलखावेगळी माणसे हे कार्यक्रम खूप गाजले़
विशेष म्हणजे ५० विक्षिप्त माणसे निवडण्यासाठी पुण्याबाहेर जावे लागले नाही, असे गाडगीळ यांनी सांगताच सर्वत्र हंशा पिकला़ दैनंदिन डायरी लिहिण्याच्या सवयीमुळे स्मरणशक्ती वाढल्याचे सांगून गाडगीळ यांनी अनेक नामवंतांचे किस्से यावेळी सांगितले़ तोंडी परीक्षेचे शिक्षक आणि विद्यार्थी असे मुलाखतीचे तंत्र असू नये, प्रश्न मोठे नसावेत,प्रश्न केव्हा आणि कसा विचारायचा याची उजळणी मुलाखत घेणाºयाकडे असणे गरजेचे असल्याचे गाडगीळ यांनी सांगितले़