मुलाखती अगोदरच उमेदवार निश्चित

By Admin | Published: January 24, 2017 11:13 PM2017-01-24T23:13:05+5:302017-01-24T23:13:25+5:30

शिवसेना : पदाधिकाऱ्यांनीच परस्पर पॅनल ठरविल्याचा इच्छुकांचा आरोप

Interviews already determine the candidate | मुलाखती अगोदरच उमेदवार निश्चित

मुलाखती अगोदरच उमेदवार निश्चित

googlenewsNext

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेण्याची औपचारिकता सुरू असताना, शिवसेनेच्या काही इच्छुकांनी तर संपर्कप्रमुख अजय चौधरी यांच्यासमोरच हा फार्स असल्याचा आरोप केल्याचे वृत्त आहे. काही पदाधिकाऱ्यांनी अन्य पक्षांतील इच्छुकांना आपल्याबरोबरच घेऊन प्रचार सुरू केल्याने आता मुलाखती कशासाठी घेतात, असा प्रश्न उपस्थित केल्याचे समजते.  महापालिकेच्या निवडणुकीसाठी सध्या शिवसेनेच्या वतीने मध्यवर्ती कार्यालयात मुलाखती घेणे सुरू असून, त्यातही मूळ पक्षातील कार्यकर्त्यांबरोबरच निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारीसाठी आलेल्यांची संख्या अधिक आहे त्या पार्श्वभूमीवर वादाला तोंड फुटल्याचे समजते. नाशिक पश्चिममधील एका प्रभागाच्या मुलाखतीच्या दरम्यान, दोन इच्छुकांनी या मुलाखतींचा फार्स असल्याचे मत व्यक्त केले. शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीचा एक माजी नगरसेवकाला पक्षात प्रवेश दिल्यानंतर त्याच्यासमवेत प्रचार सुरू केला तसेच पक्षातील एका महिलेला पॅनलमध्ये घेतले आणि आपण ज्यावेळी आपण इच्छुक असल्याचे पदाधिकाऱ्याला सांगितले, त्यावेळी पदाधिकाऱ्याने तीन महिन्यांपूर्वीच आपले तीन जणांचे पॅनल निश्चित झाल्याचे सांगितले आणि प्रचारही सुरू झाला, असे संबंधित इच्छुकाने सांगताना असे असेल तर आता मुलाखती कशासाठी, असा प्रश्न केल्याचे सांगण्यात आले.  पक्षातील कार्यकर्त्यांना त्यांचे योगदान आणि पक्षासाठी किती गुन्हे दाखल करून घेतले, असे प्रश्न केले जातात. अन्यत्र पक्षांतर केले होते काय, असे विचारणा केली जाते, मग निवडणुकीच्या तोंडावर पक्षात घेतलेल्या अन्य पक्षांतील आजी-माजी नगरसेवकांचे काय योगदान आहे, असा प्रश्नही दोघा इच्छुकांनी केल्याचे समजते.  याशिवाय शिवसेनेत अनेकांनी आपल्या स्वत:च्या उमेदवारीबरोबरच पत्नी, मुलगा, भाऊ, भावजयी अशा अनेकांसाठी दावेदारी केली असून त्याविषयीही मूळ कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. शिवसेनेतील काही विद्यमान नगरसेवकांनी आपल्या कुटुंबीयासाठी उमेदवारी मागितली असून, त्यात सिडको विभागात अशाप्रकारे सर्वाधिक दावेदारी आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसमधून दाखल झालेल्या एका नगरसेवकाने एकाच प्रभागातून स्वत:, पत्नी आणि मुलगा यांच्यासाठी उमेदवारी मागितली आहे, तर एका विद्यमान नगरसेवकाने आपल्या प्रभागात पती-पत्नी अन्य प्रभागांतून आपल्या चिरंजिवांसाठी दावेदारी केली आहे. प्रभाग आरक्षित झाल्याने कुटुंबातील सदस्यांना पुढे करणे ठीक, परंतु येथे मात्र एकेका कुटुंबात किती उमेदवारी द्याव्यात याचा विचार पक्षाने करावा, अशी मागणी होऊ लागली आहे. (प्रतिनिधी)




 

Web Title: Interviews already determine the candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.