ओबीसींना हक्कापासून वंचित ठेवण्याचा डाव : ललितकुमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 01:12 AM2020-11-30T01:12:09+5:302020-11-30T01:12:28+5:30
ओबीसीला मोठा इतिहात आहे, पण दुर्दैवाने याबाबतची जाणीव समाजाला नसल्याने आजवर ओबीसींना डावलण्यात आले आहे. ओबीसींची जणगणना केली जात नसल्याने ओबीसींची खरी संख्या समोर येत नाही. त्यामुळेच ओबीसी समाज हक्कापासून वंचित झाला आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय ओबीसी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललितकुमार यांनी केले.
नाशिक : ओबीसीला मोठा इतिहात आहे, पण दुर्दैवाने याबाबतची जाणीव समाजाला नसल्याने आजवर ओबीसींना डावलण्यात आले आहे. ओबीसींची जणगणना केली जात नसल्याने ओबीसींची खरी संख्या समोर येत नाही. त्यामुळेच ओबीसी समाज हक्कापासून वंचित झाला आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय ओबीसी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललितकुमार यांनी केले. अध्यक्षस्थानी महासभेचे राज्य अध्यक्ष ॲड. रघुनाथ महाले होते.
गंजमाळ येथील हॉटेल रॉयल हेरिटेज येथे अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. श्रावण देवरे, चंद्रपूर येथील ॲड. अंजली साळवे, स्टुडंट राइट्स असोसिएशनचे प्रा. उमेश कोरराम, शशिकांत धाडी, किशोर वैती, प्रेमलता साळी, सुधीर सुर्वे आदी उपस्थित होते.
यावेळी ललितकुमार म्हणाले, ओबीसी समाजाला इतिहासाची जाणीव नाही. वेगवेगळ्या पक्षात असलेल्यामुळे समाजाविषयीची आत्मियता सांभाळली जात नाही. अनेक विचारवंत आहेत, परंतु त्यांचा अभ्यास नाही, जनजागृती नाही त्यामुळेच समाजावरील हक्काविषयीची जनजागृती करण्यासाठी देशभर मोहीम सुरू करण्यात आली असल्याचे ललितकुमार म्हणाले. ओबीसींनी आपला इतिहास समजून घेतला पाहिजे. आपली संस्कृती आणि तिचे महत्त्व ओळखले तरच समाजाविषयी जागरूकता येईल याविषयीची जनजागरूकता होणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. मंडल कमिशनच्या वेळीच ओबीसींची जनगणना होणे अपेक्षित होते. त्यामुळेच समाजाची खरी लोकसंख्या समोर येत नसल्याने न्याय हक्क मिळत नसल्याची खंत ललितकुमार यांनी व्यक्त केली. याप्रसंगी अनेक मान्यवरांनीदेखील आपली भूमिका मांडली.
प्रास्ताविक प्रा. डॉ. विजय पवार यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन माजी न्यायमूर्ती अनिल वैद्य, चंद्रकांत सोनार, संजय बच्छाव, चंद्रकांत गायकवाड, शोभा देवरे, विद्या घायतड, गौरव वाघ आदींनी केले.