आदिवासी शेतकऱ्याला भूमिहीन करण्याचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:14 AM2021-05-15T04:14:43+5:302021-05-15T04:14:43+5:30
विना परवानगीने शेतात वनतळ्याचे काम सुरु मनोज देवरे लोकमत न्यूज नेटवर्क कळवण : तालुक्यातील ओतूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एका आदिवासी ...
विना परवानगीने शेतात वनतळ्याचे काम सुरु
मनोज देवरे
लोकमत न्यूज नेटवर्क
कळवण : तालुक्यातील ओतूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एका आदिवासी मालकीच्या खासगी क्षेत्र असलेल्या शेतात वन विभागाच्या यंत्रणेने कुठलीही परवानगी न घेता वनतळ्याच्या कामाला सुरुवात करून खोदकाम सुरू केले आहे. यामुळे संबंधित आदिवासी कुटुंब भूमिहीन होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, ओतूर परिसरात वन विभागाने ओतूर, मुळाणे भागात अशा पद्धतीने विनापरवानगी शेतकऱ्यांच्या खासगी क्षेत्रात शेतात वनतळे केल्याचे बोलले जात असून वन विभागाच्या मनमानी पद्धतीच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी ओतूर परिसरातील जनतेने केली असून गोधडे कुटुंबीयांनी न्याय मिळवून देण्याची मागणी आमदार नितीन पवार यांच्याकडे केली आहे.
पेसा कायदाअंतर्गत अशा पद्धतीने ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय राखीव वन व खासगी क्षेत्रात वनतळे करण्याचा अधिकार कुणालाही नाही. परंतु वन विभागाकडून कळवण तालुक्यात मनमानी कारभार सुरू असल्याचे ओतूर येथील वनतळ्याच्या कामानिमित्ताने समोर आले आहे.
ओतूर येथील आदिवासी शेतकरी तानाजी काशिराम गोधडे यांच्या मालकीच्या गट क्र. ८८/३ मध्ये ८० आर जमीन त्यांची परवानगी न घेता त्यांच्या शेतात विनापरवानगी पोकलॅनच्या साहाय्याने वन विभागाच्यावतीने वनतळ्याच्या कामास सुरुवात करण्यात आली असून खोदकाम सुरू केले आहे. गोधडे यांनी या कामास हरकत घेतली असून शेतात वनतळे झाल्यावर त्यांना शेतजमीन राहणार नसून ते भूमिहीन होणार आहेत. गोधडे यांना तीन मुले असून त्यांच्या कुटुंबीयांची उपजीविका करण्याची मोठी समस्या निर्माण होणार आहे.
कळवण तालुक्यातील ओतूर परिसरात राष्ट्रपती यांनी घोषित केलेले अनुसूचित क्षेत्र आहे. या क्षेत्रास पेसा कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार पेसा क्षेत्रातील आदिवासींच्या ग्रामसभांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. तसेच वनहक्क कायदा २००६ मधील कलम ३ (१) मध्ये वननिवासी अनुसूचित जमाती किंवा पारंपरिक वननिवासी यांना प्राप्त झालेले हक्क नमूद केले आहेत. अनुसूचित क्षेत्रात वन विभागाने कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी त्या क्षेत्रातील ग्रामसभेची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. असे असताना ओतूर परिसरात वन विभागअंतर्गत करण्यात आलेल्या विकास कामांसाठी वन विभागाने कुठलीही परवानगी घेतलेली नसल्याचे समोर आले आहे.
कोट...
कळवण व सुरगाणा तालुक्यात वन विभागाचा मनमानी कारभार असून खासगी क्षेत्रात वनतळे बांधून आदिवासींना भूमिहीन करण्याचा वन विभागाचा डाव असल्याचे ओतूरच्या घटनेवरून समोर आले आहे. त्यामुळे कळवण व सुरगाणा तालुक्यात गेल्या पाच वर्षात वन विभागाने केलेल्या मनमानी कारभाराची व कामांची चौकशी करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार आहे.
- नितीन पवार, आमदार, कळवण
इन्फो...
कर्मचारी झाले कंत्राटदार
वन विभागाने काम करीत असताना पूर्वी केलेल्या सिटीच्या जागी परत नवीन सिटी केल्या. माती नालाबांध जवळपास असताना त्याच्या जवळच माती नालाबांध केले. परिणामी शासनाच्या खर्चाचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय झाला असून कळवण व सुरगाणा तालुक्यातील काही कर्मचारी कंत्राटदार झाले असून तेच वन विभागाची कामे करीत असल्याचे समोर आले आहे.