प्राणिमित्रावर हल्ला; दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 01:02 AM2018-06-08T01:02:15+5:302018-06-08T01:02:15+5:30
इंदिरानगर : ‘आवास’ या प्राणिप्रेमी संस्थेचे अध्यक्ष गौरव क्षत्रिय यांच्या अंगावर बुधवारी (दि.६) पिकअप जीप घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.
इंदिरानगर : ‘आवास’ या प्राणिप्रेमी संस्थेचे अध्यक्ष गौरव क्षत्रिय यांच्या अंगावर बुधवारी (दि.६) पिकअप जीप घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.
वडाळा-पाथर्डी रस्त्यावरून इंदिरानगरमार्गे गोमांसची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर क्षत्रिय यांनी तत्काळ इंदिरानगर परिसरात धाव घेऊन संशयास्पद महिंद्र पिकअप जीप (एमएच १५, ईक्यू ६६२३) अडविली. यावेळी संशयित युनूस शहा व जुनेद सय्यद या दोघांसोबत क्षत्रिय यांचा वाद झाला. क्षत्रिय यांनी पोलिसांना माहिती देणार असल्याचे सांगितल्यानंतर दोघे संशयित जीपमध्ये बसले आणि त्यांच्यापैकी चालकाने जीपने क्षत्रिय यांना धडक दिली. या धडकेत क्षत्रिय हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दोघा संशयितांविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांनी याप्रकरणी गांभीर्याने तपास करत गुरुवारी सकाळी गुन्ह्यात वापरलेल्या जीपसह दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, क्षत्रिय यांनी कुठल्याही प्रकारे इंदिरानगर पोलीस ठाणे, पोलीस नियंत्रण कक्ष अथवा गुन्हे शाखेला अशा पद्धतीने अवैध गोमांस होत असल्याची पूर्वमाहिती दिली नव्हती, त्यामुळे पोलीस याबाबत अनभिज्ञ होते, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कुठल्याही प्रकारे शहरात कोठेही काहीही अवैध व्यवसाय आढळून आल्यास संबंधितांनी त्याची माहिती अगोदर पोलिसांना कळवावी.