हायवेवरून ‘सागरी राजा’ची निघाली स्वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2021 01:26 AM2021-10-21T01:26:30+5:302021-10-21T01:26:58+5:30
‘सागरी राजा’ (सी-किंग) म्हणून भारतीय नौसेनेत ओळखले जाणारे युएच-३एच हेलिकॉप्टर देवळालीत दाखल झाले. सागरी तटांवर गस्त असो की एखादे लष्कराचे शोधकार्य किंवा बचावकार्यासाठी सक्षम असलेल्या या हेलिकॉप्टरची स्वारी चक्क नाशिकमधील ओझर विमानतळ ते देवळाली स्कूल ऑफ आर्टिलरी अशी महामार्गावरून झाली. यावेळी शहर, ग्रामीण वाहतूक नियंत्रण शाखेकडून चोख बंदोबस्त व वाहतुकीचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले होते. रात्री उशिरा हे हेलिकॉप्टर ट्रॅक्टरच्या साहाय्याने टोइंग करून नेण्यात आले.
नाशिक : ‘सागरी राजा’ (सी-किंग) म्हणून भारतीय नौसेनेत ओळखले जाणारे युएच-३एच हेलिकॉप्टर देवळालीत दाखल झाले. सागरी तटांवर गस्त असो की एखादे लष्कराचे शोधकार्य किंवा बचावकार्यासाठी सक्षम असलेल्या या हेलिकॉप्टरची स्वारी चक्क नाशिकमधील ओझर विमानतळ ते देवळाली स्कूल ऑफ आर्टिलरी अशी महामार्गावरून झाली. यावेळी शहर, ग्रामीण वाहतूक नियंत्रण शाखेकडून चोख बंदोबस्त व वाहतुकीचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले होते. रात्री उशिरा हे हेलिकॉप्टर ट्रॅक्टरच्या साहाय्याने टोइंग करून नेण्यात आले.
भारतीय नौदलाच्या संपर्क कक्षाचे कमांडर ऑफिसर यांच्या नियंत्रणाखाली मंगळवारी (दि. १९) रात्री १० वाजता ओझर विमानतळावरून देवळाली स्कूल ऑफ आर्टिलरीच्या दिशेने ट्रॅक्टरच्या टाेइंगद्वारे नेले गेले. यावेळी ओझर विमानतळ येथून निघालेले हे हेलिकॉप्टर जानोरी रस्त्याने मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आले. तेथून द्वारकेमार्गे मुंबईनाका, राणेनगर येथून पाथर्डीफाट्यावरून देवळाली-वडनेर रस्त्याने मिलिटरी फार्म लॅमरोड देवळाली येथील स्कूल ऑफ आर्टिलरी येथे पोहोचले.
या हेलिकॉप्टरला वाहतुकीसाठी ‘संरक्षित वाहन पक्षी’ असे तात्पुरते नाव देण्यात आले होते. हे हेलिकॉप्टर घेऊन निघालेल्या ताफ्यात हेलिकॉप्टरला टोइंग केलेले ट्रॅक्टर, एक ट्रक, ट्रेलर, दोन मोटर युनिट वाहन, एक मोबाईल वाहनाचा समावेश होता. मुख्य अधिकारी म्हणून वाहतूक शाखेचे उपायुक्त तसेच परिमंडळ-१ व २चे उपायुक्त व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांच्यावर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी वाहतूक अधिसूचनेद्वारे वाहतूक नियंत्रण व बंदोबस्ताची जबाबदारी सोपविली होती. जेणेकरून या ‘संरक्षित वाहन पक्षी’च्या ताफ्याला कोठेही अडथळा निर्माण होणार नाही, याबाबत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे आदेश अधिसूचनेद्वारे देण्यात आले होते.
--इन्फो--
स्वतंत्र ‘लेन’ ताफ्यासाठी उपलब्ध
या हेलिकॉप्टरची वाहतूक करणाऱ्या ताफ्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर एक स्वतंत्र लेन उपलब्ध करून देण्यात आली. या लेनवर अन्य कोणत्याही वाहनाला प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला होता. तसेच या लेनवर कोणतेही वाहन येऊ नये, यासाठी जोड रस्त्यांवर बॅरिकेड टाकण्यात येऊन तेथे वाहतूक पोलिसांची शहर व ग्रामीण हद्दीत नियुक्ती करण्यात आली होती.
---इन्फो--
तत्काळ बुजविले खड्डे
हेलिकॉप्टरच्या ताफ्याला कोठेही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी तत्काळ महामार्ग प्राधिकरणासह महापालिका प्रशासन व देवळाली छावणी परिषदेला अधिसूचनेद्वारे रस्त्यांमधील खड्डे त्वरित बुजविण्याचे आदेश देेण्यात आले होते. यानुसार स्वतंत्र लेन व पाथर्डी फाटा ते वडनेर रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे बुजविले गेले होते. यामुळे या ताफ्याला विनाअडथळा सुरक्षित प्रवास करणे शक्य झाले.