चलार्थपत्र मुद्रणालयातील गुदामाला लागली आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:32 AM2018-10-30T00:32:32+5:302018-10-30T00:32:52+5:30
जेलरोड येथील चलार्थपत्र मुद्रणालयातील विभाग ४ मधील कच्च्या मालाच्या गुदामाला लागलेली आग त्वरित विझवण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.
नाशिकरोड : जेलरोड येथील चलार्थपत्र मुद्रणालयातील विभाग ४ मधील कच्च्या मालाच्या गुदामाला लागलेली आग त्वरित विझवण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. चलार्थपत्र मुद्रणालयातील विभाग ४ मध्ये विविध कच्च्या मालाचे गुदाम आहेत. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाकडी खोकी पडलेली आहेत. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गुदाममधून धूर निघत असल्याचे कामगारांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित सदर बाब केंद्रीय औद्योगीक सुरक्षा दलाच्या जवानांना सांगितली. सुरक्षा दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीचे पसरत चाललेले रौद्र रूप पाहून मुद्रणालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सदर घटनेची माहिती दिली. तोपर्यंत मुद्रणालयाचा अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला होता. आगीची तीव्रता बघून दुर्गा उद्यान येथील मनपाच्या अग्निशामक दलाच्या दोन बंबांना पाचारण करण्यात आले. मुद्रणालयाचे तीन व मनपाच्या दोन अशा पाच बंबांनी काही वेळातच आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. गेल्या काही महिन्यांत दुसºयांदा मुद्रणालयात आग लागली असून,व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा दुर्घटनेला आमंत्रण देत असल्याचे कामगारांमध्ये बोलले जात आहे.