‘इसिस’ला फंडिंग करणाऱ्या हुजेफच्या साथीदारांचा शोध सुरू; न्यायालयाकडून कारागृहात रवानगी
By अझहर शेख | Published: February 5, 2024 05:56 PM2024-02-05T17:56:05+5:302024-02-05T17:57:11+5:30
मागील आठवड्यात एटीएसच्या पथकाने संशयित हुजेफ यास तिडके कॉलनीमधून अटक केली होती.
नाशिक : दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शहरातील तिडके कॉलनीमधून अटक केलेल्या इंजिनीअर असलेला आरोपी हुजेफ अब्दुल अजीज शेख (३०) यास जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी (दि.५) न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याची पाच दिवसांची पोलिस काेठडी संपल्याने एटीएस पथकाने त्यास न्यायालयात हजर केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश मृदुला भाटिया यांनी हुजेफची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्याच्या साथीदारांचा एटीएसकडून आता शोध सुरू आहे.
मागील आठवड्यात एटीएसच्या पथकाने संशयित हुजेफ यास तिडके कॉलनीमधून अटक केली होती. त्यास न्यायालयाने आतापर्यंत एकूण १४ दिवसांची पोलिस कोठडी दिली. पोलीस कोठडीची मुदत आता पुर्ण झाल्याने न्यायालयाने त्यास येत्या २० तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले. यावेळी दहशतवादविरोधी पथकाच्या तपासी अधिकारी यांनी १६दिवसांच्या पोलिस कोठडीचा अधिकार राखीव ठेवला आहे. या सुनवाणीप्रसंगी न्यायालयात सरकार पक्षाकडून विशेष जिल्हा सरकारी वकील अजय मिसर हे उपस्थित होते. दरम्यान, हुजेफ याचा मनी ट्रेल, दुबईमार्गे हवालाचा ट्रेल न्यायालयापुढे मांडण्यात आला आहे. त्याच्या उर्वरित साथीदारांचा एटीएसकडून शोध सुरू आहे. जेव्हा, त्याचे साथीदार हाती लागतील तेव्हा, पुन्हा गरज भासल्यास हुजेफ याची पोलीस कोठडीची मागणी एटीएसकडून न्यायालयाकडे केली जाऊ शकते, असे सुत्रांनी सांगितले.