खिचडी प्रकरणाची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 01:22 AM2019-12-10T01:22:57+5:302019-12-10T01:23:17+5:30
वडाळा येथील मनपा शाळेत शिळी वास येणारी खिचडी विद्यार्थ्यांना देण्यात आल्यानंतर खिचडीच्या एकूणच ठेक्यांविषयी शंका घेतली जात आहे. स्थायी समितीने या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहेच, परंतु आयुक्तांनीदेखील अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली आहे,
नाशिक : वडाळा येथील मनपा शाळेत शिळी वास येणारी खिचडी विद्यार्थ्यांना देण्यात आल्यानंतर खिचडीच्या एकूणच ठेक्यांविषयी शंका घेतली जात आहे. स्थायी समितीने या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहेच, परंतु आयुक्तांनीदेखील अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली आहे, त्यामुळे आता खिचडी प्रकरणाची दुहेरी चौकशी होणार आहे.
राज्य शासनाच्या वतीने बचत गटांकडील पोषण आहाराचे काम काढून घेऊन त्याऐवजी सेंट्रल किचन योजना राबविण्यात आली. सेंट्रल किचनसाठी निविदा मागविल्यानंतर महपालिकेने एकच सेंट्रल किचन ऐवजी तेरा सेंट्रल किचन तयार करण्याचा अजब प्रकार केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे बचत गटविरुद्ध सेंट्रल किचनचे ठेके यावरून आधीच वाद सुरू असताना गेल्या आठवड्यात वडाळा येथे मुलांना शिळी खिचडी वाटप करण्याचा प्रकार उघड झाला होता. पालक आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागानेदेखील खिचडीचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.
या प्रकारानंतर विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी ठेक्याविषयी शंका व्यक्त करीत या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली होती, तर गेल्या आठवड्यात स्थायी समितीच्या बैठकीत या विषयावरून वादळी चर्चा झाली हाती. समितीचे सदस्य दिनकर पाटील, संतोष साळवे, सुषमा पगारे, कल्पना पांडे यांनी खिचडीच्या ठेक्यातील गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार समितीचे सभापती उद्धव निमसे यांनी चार सदस्यांची उपसमिती नियुक्त केली असून, दहा दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या निर्णयाला अवघे तीन दिवस होत नाही तोच महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मुख्य लेखापरीक्षक तथा अतिरिक्त आयुक्त सोनकांबळे यांना खिचडी ठेक्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
शालेय पोषण आहार योजनेतील नियम, निकष व अटीशर्तींबरोबरच संबंधित तेरा संस्थांच्या कारभाराचीही चौकशी केली जाणार आहे. या चौकशी समितीत सोनकांबळे यांच्याबरोबरच पुरवठा अधिकारी व आहार तज्ज्ञ यांचाही समावेश असणार आहे. त्यासाठी पुरवठा अधिकारी आणि आहारतज्ज्ञ या दोन्ही अधिकाऱ्यांना मनपामार्फत पत्र देऊन त्यांना चौकशीच्या कार्यवाहीत समाविष्ट करून घेण्यता येणार आहे.
‘त्या’ अहवालाची प्रतीक्षा
महापालिकेच्या वडाळा येथील शाळेत ज्या दिवशी सदोष खिचडी वाटपाची घटना घडली. त्याच दिवशी शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने खिचडीचे नमुने घेतले होते. त्याचा अहवाल मात्र अप्राप्त असून, तो आल्यानंतर खºया अर्थाने चौकशीला वेग येणार आहे. त्यामुळे सदर चौकशी महत्त्वाची ठरणार आहे.