पोस्टात गुंतवणूक; बचत खाते सक्तीचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:04 AM2017-10-28T00:04:31+5:302017-10-28T00:12:24+5:30
टपाल खात्यामार्फत चालविण्यात येणाºया विविध प्रकारच्या बचत आणि मुदत ठेवीच्या योजनांसाठी ग्राहकांना टपाल खात्यातच बचत खाते उघडावे लागणार आहे. टपाल खात्यात ज्या ग्राहकांची अशा प्रकारची खाती आहेत त्यांना बचत खाते उघडण्याचे आवाहन टपाल खात्याने केले असून, यासाठी मुख्य टपाल कार्यालयात विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे.
नाशिक : टपाल खात्यामार्फत चालविण्यात येणाºया विविध प्रकारच्या बचत आणि मुदत ठेवीच्या योजनांसाठी ग्राहकांना टपाल खात्यातच बचत खाते उघडावे लागणार आहे. टपाल खात्यात ज्या ग्राहकांची अशा प्रकारची खाती आहेत त्यांना बचत खाते उघडण्याचे आवाहन टपाल खात्याने केले असून, यासाठी मुख्य टपाल कार्यालयात विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. टपाल विभागात गुंतवणुकीसाठीच्या अनेक योजना असून, शहरातील मुख्य टपाल कार्यालयाबरोबरच शहरातील अन्य टपाल कार्यालयांमध्ये या योजना सुरू आहेत. नियमित बचत खाते तसचे मुदत ठेवीची अनेक खाती ग्राहक उघडतात. मुदतीनंतर किंवा दरमहा व्याजासाठी त्यांना टपाल कार्यालयात येऊन वारंवार विचारणा करावी लागते. आता ग्राहकांच्या टपाल खात्यावरच थेट पैसे जमा केले जाणार असल्याने त्यांना खाते उघडणे सक्तीचे करण्यात आले आहे. टपाल खात्याच्या योजनांचे ग्राहक हे महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांचा त्रास टाळण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आल्याची माहिती मुख्य पोस्टमास्तर एम. एस. अहिरराव यांनी दिली. टपाल खात्यामध्ये सुकन्या समृद्धी योजना, आवर्ती जमा योजना, मुदत ठेव, मासिक प्राप्ती योजना, पीपीएफ, इंदिरा विकास पत्र, किसान विकासपत्र, ज्येष्ठ नागरिक खाते अशा असंख्य योजना आहेत.
या योजनेतील ग्राहकांना पैशांची तसेच मुदतीची विचारणा करण्यासाठी आणि पैसे मिळविण्याची प्रक्रिया विचारण्यासाठी मुख्य टपाल कार्यालयात यावे लागते. आता यापुढे मुदत पूर्ण झालेल्यांच्या खात्यावर तसेच योजनांच्या माध्यमातून प्राप्त होणारे पैसे हे त्या ग्राहकाच्या खात्यात जमा होणार आहे. त्याला सातत्याने विचारपूस करण्याची गरज पडणार नाही किंवा नंतरची प्रक्रियादेखील करण्याची आवश्यकता राहणार नाही. टपाल खाते उघडण्यासाठी तीन छायाचित्रे, पॅन, आधार कार्डसोबत आणावे लागणार आहे. किमान ५० रुपये भरून ग्राहकांना खाते उघडता येणार आहे.
भुर्दंड : ग्राहकाला येणार खर्च
यापूर्वी २० हजारांपर्यंतची देयक रक्कम ही थेट ग्राहकाला दिली जात होती, तर २० हजारांच्या पुढील रक्कम असेल तर त्याचा धनादेश दिला जात असे. त्यामुळे ग्राहकांना मिळालेला धनादेश हा त्यांच्या बॅँकेत टाकावा लागत असे. परंतु आता सर्व प्रकारची रक्कम ही ग्राहकांच्या टपाल बचत खात्यातच समाविष्ट केली जाणार आहे. खाते उघडण्यासाठी ग्राहकाला किमान ५० रुपये खर्च येणार आहे.