ओडिसातील मायक्रो फायनान्सकडून गुंतवणूकदारांची फसवणूक
By admin | Published: January 14, 2015 11:54 PM2015-01-14T23:54:03+5:302015-01-14T23:54:20+5:30
सत्तर ते ऐंशी लाखांची गुंतवणूक : भद्रकाली पोलिसांना निवेदन
नाशिक : केबीसी, विकल्प या पाठोपाठ आता ओडिसा येथील मायक्रो फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने गुंतवणूकदार व ठेवीदारांना विविध ठेव योजनांचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे़ या फसवणुकीबाबत शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून गुंतवणूकदार व ठेवीदारांनी भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना निवेदन दिले आहे़ कंपनीने देशभरातील विविध शाखांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली असून, रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने जुलै २०१४ मध्ये कंपनीचा परवाना रद्द केला आहे़
भद्रकालीतील साक्षी गणेश मंदिराजवळील एकसत्य कॉम्प्लेक्समध्ये गेल्या तीन वर्षांपासून मायक्रो फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कार्यालय होते़ कंपनीचे मुख्य कार्यालय अन्नपूर्णा, प्लॉट क्रमांक ६८ (पी), रसूलगढ, भुवनेश्वर, ओडिसा येथे असून, नाशिकमधील कार्यालय गेल्या महिनाभरापासून बंद असल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत़ हातमजूर, कामगार यांसह नागरिकांनी कंपनीच्या आवर्तक ठेव योजना, मुदत ठेव योजना, मासिक ठेव योजनेमध्ये सुमारे सत्तर ते ऐंशी लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे़
देशभरात वेगवेगळ्या पद्धतीचे उद्योग उभारले जात असल्याची माहिती कंपनीकडून गुंतवणूकदारांना देण्यात आली होती़ त्यामध्ये मायक्र ो कन्स्ट्रक्शन, मायक्रो हॉस्पिटल, मायक्रो फिल्म अॅण्ड एंटरटेन्मेंट, मायक्रो लिजिंग अॅण्ड फंडिंग, एमबीसी टीव्ही चॅनल यामध्ये कंपनीने केलेल्या गुंतवणूक व कंपनीचा गैरकारभार यामुळे रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने ३ जुलै २०१४ रोजी परवाना रद्द केला आहे़ कंपनीचे कार्यालय बंद असल्याने अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता सीबीआय चौकशी, महाव्यवस्थापकाला अटक, चौकशी झाल्यानंतर पैसे मिळतील, अशी उत्तरे दिली जातात़ या कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून गुंतवणूकदार व ठेवीदारांना दिल्या जात असलेल्या उत्तरांमुळे ते हवालदिल झाले आहेत़ कंपनीने शहरातील अनेक नागरिकांकडून पैसे जमा करून त्यांना गंडा घातला असून, कार्यालयही बंद केले आहे़त्यामुळे कंपनीने फसवणूक केल्याचे दिसत असून, या कंपनीवर कारवाई करून पैसे मिळवून देण्याच्या मागणीचे निवेदन गुंतवणूकदारांनी भद्रकाली पोलिसांना दिले. (प्रतिनिधी)