गुंतवणूकदार, संचालक आमने-सामने
By admin | Published: June 18, 2016 11:01 PM2016-06-18T23:01:03+5:302016-06-19T00:33:26+5:30
महिन्याची मुदत : ..तर कायदेशीर कारवाई
नाशिक : ‘हाउस आॅफ इनव्हेस्टमेंट’चे संचालक संशयित विनोद पाटील यांनी बोलविलेल्या पत्रकार परिषदेची कुणकुण गुंतवणूकदारांना लागताच शेकडो गुंतवणूकदार येथे जमले. दरम्यान, पाटील यांनी सर्व गुंतवणूकदारांना महिनाभरात व्याज अथवा रक्कम परत दिली जाईल, असे आश्वासन देत कुठल्याहीप्रकारे घोटाळा केला नसल्याचा दावा केला; मात्र गुंतवणूकदारांनी सर्व काही संशयास्पद असून, मागील तीन महिन्यांपासून आश्वासनांचा पाऊस पाटील यांच्याकडून पाडला जात असल्याचा आरोप केला.
पत्रकार परिषदेप्रसंगी गुंतवणूकदारच जास्त संख्येने हजर होते. ‘हाउस आॅफ इनव्हेस्टमेंट’ कंपनीनेही हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याच्या आरोपाचे संशयित संचालक विनोद पाटील यांनी खंडन केले. गुंतवणूकदारांना २४ टक्के व्याजाचे आमिष दाखविण्यात आले होते; मात्र कंपनीने काही महिन्यांपासून व्याजाची रक्कम देणेच बंद केले व पैसेही परत करण्यास नकार देत काही दिवसांनी गुंतवणूकदारांशी संवाद साधणे बंद केले सुमारे तीन हजारांपेक्षा अधिक या कंपनीचे शहरात गुंतवणूकदार असल्याचे यावेळी उपस्थित काही गुंतवणूकदारांनी सांगितले; मात्र पाटील यांनी केवळ ४२३ गुंतवणूकदार असून, केवळ ‘हाउस आॅफ इनव्हेस्टमेंट’ ही एकच कंपनी कार्यरत असून, उर्वरित पाचही कंपन्या बंद झाल्याचे पाटील यावेळी म्हणाले. सर्व गुंतवणूकदार हे ‘हाउस आॅफ इनव्हेस्टमेंटचे असल्याचे ते म्हणाले.
या कंपनीचे तीस एजंट असून, २९ कर्मचारी असल्याची माहिती देत महिनाभरात कंपनीचे सर्व आर्थिक व्यवहार सुरळीत होतील, असा दावा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.