गुंतवणूकदारांना सुमित कंपनी लिलावात विकू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 12:30 AM2019-01-26T00:30:57+5:302019-01-26T00:31:12+5:30
वसुली न्यायप्राधिकरणाने लिलावात काढलेली सुमित मशीन टुल्स कंपनी लिलावात विकताना केवळ गुंतवणूकदारांना विकू नये, तर खऱ्या अर्थाने उद्योग सुरू करणाºया उद्योजकालाच विकण्यात यावी, अशी तीव्र भावना उद्योग वतुर्ळात व्यक्त केली जात आहे. अन्यथा अन्य उद्योगांप्रमाणेच हा उद्योगदेखील गुणवणूक करून पडून राहील.
सातपूर : वसुली न्यायप्राधिकरणाने लिलावात काढलेली सुमित मशीन टुल्स कंपनी लिलावात विकताना केवळ गुंतवणूकदारांना विकू नये, तर खऱ्या अर्थाने उद्योग सुरू करणाºया उद्योजकालाच विकण्यात यावी, अशी तीव्र भावना उद्योग वतुर्ळात व्यक्त केली जात आहे. अन्यथा अन्य उद्योगांप्रमाणेच हा उद्योगदेखील गुणवणूक करून पडून राहील.
अंबड औद्योगिक वसाहतीतील मशीन टूल्स कंपनी गेल्या २१ वर्षांपासून बंद पडलेली आहे. बँकांची देणी थकल्याने वसुली न्यायप्राधिकरणाने ही कंपनी लिलावात काढली आहे. ६ फेब्रुवारी रोजी या कंपनीची चौथी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. अतिशय प्राइम लोकेशनवर सुमारे नऊ एकर जागेवर ही कंपनी आहे. कधी काळी या कंपनीने नाशिकच्या औद्योगिक वसाहतीतीत चांगला नावलौकिक मिळविलेला होता. १९९७ साली कंपनी बंद पडली आणि कंपनीतील २११ कामगारांवर बेकारीची कुºहाड कोसळली. या कामगारांचे १४ कोटी रुपयांची देणी मिळावी, अशी मागणी आहे. वसुली न्यायप्राधिकरणाने यापूर्वी तीन वेळा लिलावप्रक्रिया राबविली आहे. आता चवथ्या वेळी ही प्रक्रिया राबविली जात आहे. यावेळी प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील बंद पडलेल्या अनेक कंपन्या धनदांडग्या गुंतवणूकदारांनी विकत घेऊन ठेवलेल्या आहेत. वास्तविक पाहता या कारखान्यांच्या जागेवर पुन्हा उद्योग सुरू होणे अपेक्षित होते.
तसे न झाल्याने हे उद्योग अनुत्पादक ठरले आहेत. एकीकडे नवीन उद्योगांना जागा मिळत नाहीत. अनेक उद्योजक भाड्याची जागा घेऊन उद्योग चालवीत आहेत, तर दुसरीकडे धनदांडग्यांनी जागा अडकवून ठेवलेल्या आहेत. याबाबत एमआयडीसीने धोरणात्मक निर्णय घेऊन या जागा ताब्यात घेऊन उद्योगासाठी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जोर धरु लागली आहे. असाच प्रकार सुमित मशीन टुल्स कंपनीबाबत घडू नये, अशी आग्रही मागणी आहे.
अंबड औद्योगिक वसाहतीतील सुमित कंपनी वसुली न्यायप्राधिकरणाने लिलावात काढली आहे. लिलाव प्रक्रिया राबविताना एमआयडीसीने धोरणात्मक निर्णय घेऊन ही कंपनी विकत घेणाºयास उद्योग लवकर सुरू करण्याची अट घातली पाहिजे. केवळ गुंतवणूक करणाºयांना अटकाव केला पाहिजे. गरजू उद्योजकांना यात जागा कशी मिळेल याचा विचार करणे गरजेचे आहे.
- संजय महाजन, अध्यक्ष, लघुउद्योग भारती
बंद पडलेल्या उद्योगांची जागा गुंतवणूकदारांना अजिबात विकू नये. एखाद्या उद्योजकाने ही जागा विकत घेऊन त्या जागेवर लहान लहान प्लॉट करून गरजू उद्योजकांना द्यावेत. किंवा काही उद्योजकांनी एकत्र येऊन सोसायटी स्थापन करून उद्योग सुरू करावेत. तशी एमआयडीसीकडे योजना आहे. सुमित कंपनीच्या साडेआठ एकर जागेवर ५०० चौरस मीटरचे ३० ते ३५ प्लॉट तयार होऊ शकतील. काही धनदांडग्या गुंतवणूकदारांनी सातपूर, अंबडमधील बंद पडलेल्या कंपन्या विकत घेऊन ठेवलेल्या आहेत. त्यांच्यावर एमआयडीसीने कारवाई करणे गरजेचे आहे. -प्रदीप पेशकार, प्रदेश अध्यक्ष उद्योग आघाडी.