फडणीस गु्रप तपासाबाबत गुंतवणूकदारांची आयुक्तांना विचारणा
By admin | Published: July 1, 2017 12:07 AM2017-07-01T00:07:15+5:302017-07-01T00:07:15+5:30
कोट्यवधीची फसवणूक ; गुंतवणूकदारांची चार तास पोलीस आयुक्तालयात ठाण
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कोट्यवधी रुपयांची फसवणूक प्रकरणी पुणे येथील फडणीस ग्रुपच्या संचालकांच्या तपासात पोलीस दिरंगाई करीत असल्याचा आरोप करीत शेकडो गुंतवणूकदारांनी शुक्रवारी (दि़ ३०) पोलीस आयुक्तालय गाठत दिरंगाईबाबत जाब विचारला़ सुमारे चार तास पोलीस आयुक्तालयात ठाण मांडलेल्या गुंतवणूकदारांची पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी या गुंतवणूकदारांची भेट घेत त्यांच्या शंकांचे निरसन केले तसेच याबाबत लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात येणार असल्याची माहिती दिली़
गुंतवणूकीवर जादा व्याजाचे आमिष दाखवून पुणे येथील फडणीस ग्रुपने शहरातील १२८ गुंतवणूकदारांची सुमारे २२ कोटी ८३ लाख रुपयांची फसवणूक केली़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात एमपीआयडीन्वये गुन्हा दाखल असून, आर्थिक गुन्हेशाखेकडून तपास सुरू आहे. ग्रुपचे संचालक विनय फडणीस यांना एप्रिलमध्ये तर अन्य दोन संचालकांना पोलिसांनी अटक केली़ या तपासाबाबत पोलिसांकडून विलंब होत असल्याचा आरोप करून गुंतवणूकदारांनी आयुक्तांच्या भेटीची मागणी केली़
पोलीस आयुक्तालयात गुन्हे शाखेची आढावा बैठक सुरू असल्याने आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सावंत यांनी गुंतवणूकदारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली; मात्र समाधान न झाल्याने आयुक्तांची भेट घेण्याची मागणी केली़ सायंकाळी सात वाजेच्या सुमारास आयुक्तांनी भेट घेत त्यांच्या शंकांचे समाधान केले़ यावेळी प्रीतीश कुलकर्णी, राजेंद्र अनंतवार, के. पी. राव, रक्षा गुजराथी, मुकुंद मुंगी, अनुराधा आगाशे, अलका फडके, मंदाकिनी भांड, जयश्री पाटील, विजय पाटील, अनिल कुलकर्णी आदींसह गुंतवणूकदार उपस्थित होते.