कोरोना काळात पडद्यामागे राबले अभियांत्रिकीचे अदृश्य हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:19 AM2021-09-15T04:19:43+5:302021-09-15T04:19:43+5:30

लोकमत न्यूज नटवर्क नाशिक : बळीराजाच्या वावराला यंत्राची पावर देणारा आणि स्वप्नातल्या घराला वास्तविक इमारतीची जोड देणारा अभियंता हा ...

The invisible hand of engineering behind the scenes during the Corona era | कोरोना काळात पडद्यामागे राबले अभियांत्रिकीचे अदृश्य हात

कोरोना काळात पडद्यामागे राबले अभियांत्रिकीचे अदृश्य हात

googlenewsNext

लोकमत न्यूज नटवर्क

नाशिक : बळीराजाच्या वावराला यंत्राची पावर देणारा आणि स्वप्नातल्या घराला वास्तविक इमारतीची जोड देणारा अभियंता हा अर्थव्यवस्थेचे एक महत्त्वाचे चाक बनलेला असतानाही त्याचे पडद्यामागे राबणारे हात प्रकाशझोतात आलेले नाहीत, अदृश्य हाताने किमया साकारणाऱ्या या रचनाकारांमध्ये अध्यापनातून यंत्र-तंत्र निर्मितीची बिजे रुजविणाऱ्या प्राध्यापकांनीही अशाच प्रकारे कोरोना काळात प्रसिद्धीपासून दूर राहत जिल्ह्यातील २८९ कोविड रुग्णालयांमधील ऑक्सिजन व अन्य यांत्रिक प्रणाली सुरळीत सुरू राहण्यासाठी अवितर परिश्रम घेत, अप्रत्यक्षरीत्या हजारो रुग्णांना जीवदान देण्याचे काम केले आहे.

नाशिक जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतनसह विविध खासगी अनुदानित व विनाअनुदानित तंत्रनिकेतन महाविद्यालयांचे प्राध्यापक व जिल्ह्यातील शहर व तालुका स्तरावरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या प्राध्यापकांनी कोविड केअर सेंटर व रुग्णालयांमधील ऑक्सिजन प्रणाली सुरळीत कार्यरत राहण्यासाठी सातत्याने मेहनत घेत, आवश्यक त्या दुरुस्ती व फेररचनेविषयीचा अहवाल शासनाला वेळोवेळी सादर केला. त्यामुळे अपवाद वगळता जिल्ह्यातील कोरोना रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्रणालीत बिघाड होऊन मृत्यू होण्याचे प्रकार टाळता आले. त्यासाठी नाशिक शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य ज्ञानदेव नाठे यांच्या नेतृत्वात आयटीआयच्या एका प्राध्यापकांना व तंत्रनिकेतनच्या एका प्राध्यापकाला अशा जवळपास ५९ वेगवेगळ्या पथकांमध्ये विभागून नाशिक जिल्ह्यातील २८९ कोरोना रुग्णालयांमधील ऑक्सिजन यंत्रणा व अन्य यांत्रिकीकरण प्रणालीच्या देखभाल दुरुस्तीसाठी अतुलनीय योगदान दिले. त्यामुळे यंत्रणेतील दोषामुळे होऊ शकणारी डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयासारख्या दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळणे शक्य झाले.

कोट-

जिल्ह्यातील शासकीय आयटीआय व व तंत्रनिकेतच्या प्राध्यापकांनी एकत्र येत सुमारे २८९ रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन यंत्रणेचे परीक्षण, दुरुस्ती व पुनर्रचनेसंदर्भात रुग्णालयांना मदत केली. आवश्यक त्या ठिकाणी तांत्रिक साहाय्य केले. यासाठी प्राध्यापकांच्या ५९ टीम तयार करण्यात आल्या होत्या. त्यात आयटीआय व तंत्रनिकेतनच्या प्रत्येकी एका प्राध्यापकाचा समावेश होता.

- ज्ञानदेव नाठे, सहसंचालक, तंत्रशिक्षण विभाग, नाशिक.

इन्फो-

जैवचिकित्सा अभियांत्रिकीचे महत्त्व अधोरेखित

जैवचिकित्सा अभियांत्रिकी म्हणजेच, बायोमेडिकल इंजिनीअरिंग ही अभियांत्रिकीची उदयोन्मुख शाखा आहे. या शाखेतील अभियंते यांत्रिक आणि वैद्यकीयदृष्ट्या उपयुक्त अशा उपकरणांना आकार देऊन ते प्रत्यक्षात साकारण्याचे काम करतात, परंतु नाशिकमधील आरोग्य क्षेत्राला या शाखेची खरी ओळख डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयात झालेल्या जीवघेण्या ऑक्सिजन गळतीनंतर झाली. या दुर्घटनेत जवळपास २२ रुग्णांना जीव गमवावा लागल्यानंतर, सर्व कोरोना हॉस्पिटलमधील ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या यंत्रणेची पडताळणी करण्याची गरज निर्माण झाली होती, परंतु आवश्यकतेच्या प्रमाणात तंत्र अवगत असलेले या शाखेतील अभियंते उपलब्ध नसल्याने, अखेर तंत्रशिक्षण देणाऱ्या प्राध्यापकांनी ही धुरा आपल्या खांद्यावर घेत, जिल्ह्यातील सर्व २८९ रुग्णालयांमधील यंत्रणेची तपासणी करून, त्यात गरजेनुसार आवश्यक ते तांत्रिक बदल व पुनर्रचनेचे काम पूर्ण करून, अशा दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अविरत परिश्रम घेतले.

Web Title: The invisible hand of engineering behind the scenes during the Corona era

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.