नाशिकला सर्व्हिसरोडवर आलेल्या इमारतीमुळे अपघाताला निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 11:56 AM2018-01-17T11:56:20+5:302018-01-17T11:57:08+5:30
नाशिक : फाळके स्मारकाजवळ समांतर रस्त्याला अगदी खेटून असलेल्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या कार्यालयामुळे येथे रोजच अपघात होत असून, हे कार्यालय स्थलांतरित करून इमारत हटविण्याची मागणीही केली जात आहे. तथापि, या खूप जुन्या इमारतीच्या अधिकृततेविषयी मात्र साशंकता असून, त्यामुळेच आजवर कारवाई झाली नसावी असाही एक सूर ऐकायला मिळतो आहे.
फाळके स्मारकाच्या अलीकडे हॉटेल तुळजाजवळ समांतर रस्त्यावरच वाटावी इतकी रस्त्यात असलेली एक जुन्या बांधकामाची बैठी इमारत आहे. गेल्या सुमारे दोन अडीच दशकांपासून येथे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे कार्यालय याच इमारतीत असून, तेथूनच पांडवलेणी व अन्य गोष्टींचे कामकाज चालते. मुंबई-आग्रा महामार्गाचे सहापदरीकरण होण्याआधी ही इमारत समांतर रस्त्यापासून लांब आणि खूपच दूर हाती. परंतु कालौघात रस्ते मोठे व रु ंद झाल्याने इमारतीचा काही भाग रस्त्यावर आला आहे. परिणामी दोन्ही बाजूने वापर असलेल्या या सर्व्हिस रस्त्यावर या इमारतीमुळे अपघात होऊ लागले आहेत. पाथर्डी फाट्याकडून फाळके स्मारकाकडे जाणाºया वाहनांना समोरून येणारे वाहन दिसत नाही. म्हणजेच ब्लार्इंड टर्न असून या ठिकाणी थोडेसे वळणही असल्याने वाहनांना अरु ंद रस्त्यामुळे अपघात होत आहे.
या इमारतीविषयी येथील रहिवासी पांडुरंग शिरसाठ सांगतात की, ही इमारत खूप जुनी असून धर्मराज मित्र मंडळांनी ती वाटसरूंच्या विश्रांतीसाठी बांधली होती. सातबारावर तिचा चावडी म्हणून उल्लेख असल्याचा शिरसाठ यांच्यासह परिसरातील नागरिकांचा दावा आहे. कालांतराने येथे पुरातत्व विभागाचे कार्यालय सुरू झाले, मात्र त्यांच्याकडे कोणतेही अधिकृत ताबापत्र, नोंदणी अशी कोणतेही कागदपत्र नाहीत, मात्र पाणीपट्टी आणि वीजबिल कार्यालयाच्या नावाने येत आहेत. मात्र पुरातत्व विभागाचे अधिकारी अनिभज्ञता दर्शवत असून, गेली सुमारे पंधरा-वीस वर्षे इथेच कार्यालय असल्याने ते अनधिकृत नसल्याचे सांगतात. ही इमारत अधिकृत की अनधिकृत किंवा कोणाच्या नावे या तांत्रिक बाबींचा काय तो शोध लावावा व आता ती रस्त्याला अडथळा ठरत असल्याने अतिक्रमित ठरवून ती महामार्ग प्राधिकरणाने हटवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.