सिंहस्थ कुंभमेळ्याचे देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण
By admin | Published: April 15, 2015 12:55 AM2015-04-15T00:55:40+5:302015-04-15T00:56:08+5:30
सिंहस्थ कुंभमेळ्याचे देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण
नाशिक : येत्या जुलै महिन्यात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे धर्मध्वजारोहण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हावे, यासाठी श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाच्या वतीने मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आले असून, त्यांनीही उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे.नाशिकमध्ये जुलै महिन्यापासून कुंभमेळ्यास प्रारंभ होणार आहे. १४ जुलै रोजी सकाळी ६.१६ वाजता रामकुंडावर धर्मध्वजारोहण सोहळा होणार आहे, त्यानंतर कुंभपर्वास प्रारंभ होणार आहे. या कार्यक्रमासाठी विविध आखाड्यांचे साधू-महंत, बैरागी, पुरोहित संघाचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी पुरोहित संघाच्या वतीने मुख्यमंत्री आणि अन्य लोकप्रतिनिधींना निमंत्रण देण्यात आले. राज्यात गोवंश हत्त्याबंदी करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन यावेळी करण्यात आले. गोवंशाचे पालन करण्यासाठी पुरोहित संघ तयार असून, त्यासाठी आवश्यक ती जागा आणि निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी केली. मुख्यमंत्र्यांबरोबरच विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच अन्य मंत्री आणि आमदारांनाही निमंत्रण देण्यात आले. यावेळी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, उपाध्यक्ष दिलीप शुक्ल, तसेच आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, उपाध्यक्ष महेश हिरे, सरचिटणीस सुरेश पाटील आणि ओमकार शौचे, प्रतीक शुक्ल, तुषार जोशी, सौरभ शुक्ल यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)