‘जॉइन द चेंज’मधून तंबाखू मुक्त नाशिकचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:01 PM2018-03-31T12:01:01+5:302018-03-31T12:01:01+5:30
विविध व्यक्तींसह संस्थांचाही पुढाकार
नाशिक : तंबाखूसारख्या व्यसनमुक्तीसाठी शहरातील विविध संस्था पुढे सरसावल्या आहेत. तंबाखुमुक्त नाशिकसाठी ‘जॉइन द चेंज’ या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. नाशिक शहराचे सौंदर्य व आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रबोधनात्मक उपक्र मात सहभागी होण्याचे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी केले. यावेळी अभियानाच्या बोधचिन्हाचे व फेसबुक पेजचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. भारतात तंबाखूविरोधात २००३ साली कायदा आला तरी त्यासंदर्भात जाणीव तसेच जागरूकता समाजात निर्माण झाली नाही. कारण कायद्याची कठोर अंमलबजावणी होत नाही, असे सांगून ज्या तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्र ीवर बंदी आहे, त्यावर पोलिसांनी मोहीम सुरू केली असून, त्याची कारवाईत वाढ करून प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन सिंगल यांनी उपस्थिताना दिले. एचसीजी मानवता हॉस्पिटलचे संचालक डॉ. राज नगरकर यांनी समाजामध्ये ४० वयोगटांखाली कर्करोगाचा रु ग्णांचे प्रमाण ६० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तंबाखू सेवनाची सुरु वात १८ वर्षे वयाच्या अगोदरपासून होते. त्यामुळे ही बाब भावीपिढीच्या आरोग्यासाठी घातक असून, यामुळे समाजाची मोठी हानी होत आहे, अशी माहिती दिली.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी पालकांनी याबाबत जागृत राहण्याचे आवाहन केले. तसेच अन्य उपस्थितांनी जनजागृतीविषयी सूचना केल्या. आभार प्रदर्शन फ्रावशी अकादमीचे संचालक रतन लथ यांनी केले.