जिल्हा रुग्णालयाच्या आवारात मिळतेय डेंगुला आमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 05:52 PM2019-09-19T17:52:41+5:302019-09-19T18:08:16+5:30
नाशिक : ज्या ठिकाणी रुग्ण उपचारासाठी येतात त्याच ठिकाणी रुग्णांना रोग जडण्याची शक्यता निर्माण होत आहे. जिल्हा रुग्णालयाच्या जवळ ...
नाशिक : ज्या ठिकाणी रुग्ण उपचारासाठी येतात त्याच ठिकाणी रुग्णांना रोग जडण्याची शक्यता निर्माण होत आहे. जिल्हा रुग्णालयाच्या जवळ कचऱ्याचे साम्राज्य बघायला मिळत असून रुग्णालयाच्या संरक्षण भिंतीजवळ रिकामे टायरे, भंगार कचरापेट्या तसेच फाटलेले कपडे पडलेले आहे. त्यामुळे ज्याठिकाणी डेंगुच्या डासांना आयते आमंत्रण मिळत आहे. त्यातच या भागातील काही दिवसांपुर्वी काढलेल्या अतिक्रमणाचे भंगार साहित्यही याठिकाणी पडलेले आढळून येत आहे. तसेच आवारात पावसाच्या पाण्याचे डबके साचत असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
जिल्हा शासकिय रुग्णालयात जिल्ह्यातील ग्रामीण भागांतील मोठ्या प्रमाणावर रुग्ण आपल्या उपचारासाठी येत असतात. मोफत उपचार मिळण्याच्या दृष्टीने याठिकाणी रोज हजारो रुग्ण तपासणीसाठी येत असतात. अशात याठिकाणी प्रशासनाकडून त्यांना चांगले उपचार मिळणे अपेक्षित आहेतच मात्र रुग्णालयाच्या आवारात स्वच्छतेच्या दृष्टीने उपाययोजना करणेही तितकेच महत्वाचे आहे. रुग्णालयामध्ये नागरिकांसाठी डेंगु, मलेरीया, स्वाईन फ्लु सारख्या आजारांसाठी जनजागृतीपर पोस्टर लावण्यात आले आहे. मात्र रुग्णालयाकडून आवारात स्वच्छतेकडे दुर्लंक्ष करण्यात येत आहे. रुग्णालयाच्या संरक्षण भिंतीजवळ मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. काही दिवसांपुर्वी संरक्षण भिंतीजवळ असलेल्या चहाच्या टपºया, दुकाने हटविण्यात आली होती. मात्र त्यातील भंगार साहित्य असूनही आवारात पडून आहे. यामध्ये रिकामे टायरे, कचरा, फाटलेले कपडे कित्येक दिवसांपासून पडून आहे. मात्र अद्यापही याठिकाणी स्वच्छतेचा प्रश्न प्रलंबित दिसत आहे. त्यामुळे रुग्णालयात येणाºया रुग्णांना प्रवेशद्वाराजवळच असे चित्र दिसत असल्यामुळे ते रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.
डेंगुला मिळतेय आमंत्रण :
मागील महिन्यात झालेल्या पावसामुळे रुग्णालयाच्या बाहेर पाण्याचे डबके साचले होते. मात्र पाऊसाने उघडीप दिल्यानंतरही याठिकाणी साचणाºया डबक्यांची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली नाही. तसेच पुन्हा शहरात पावसाचा जोर वाढल्यामुळे याठिकाणी पुन्हा मोठे डबके साचले आहे. तसेच याठिकाणी पडलेल्या टायरमध्ये पावसाचे पाणी साचले असून त्यात मोठ्या प्रमाणावर डासांची निर्मिती होत असतांना दिसत आहे. त्यात याठिकाणी साचलेला कचरा रुग्णालयाला विद्रुप करत आहे. त्यामुळे डेंगु, मलेरिया सारख्या आजरांना याठिकाणी आयते आमंत्रणच मिळत आहे.
रुग्णालयात खोकल्याच्या उपचारासाठी आलो असता रुग्णालयाच्या संरक्षण भिंतीजवळ मोठ्या प्रमाणावर कचरा दिसून येत होता. जवळ गेलो असता याठिकाणी रिकामे टायरे,कचरापेट्या आढळल्या तसेच त्यात पावसाचे पाणी साचले असुन त्यामध्ये मच्छरांचा वावर असल्याचे दिसले. त्यामुळे रुग्णालयात उपचार घ्यावा का नाही हा प्रश्न पडला. यावर येथील सुरक्षारक्षकांना याबाबत सांगून सुद्धा त्यांच्याकडुनही कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.
यशवंत फसाळे, रुग्ण