‘नियोजन’च्या बैठकीत आंदोलकांची घुसखोरी

By admin | Published: November 22, 2015 12:13 AM2015-11-22T00:13:15+5:302015-11-22T00:13:43+5:30

पोलीस बळाचा वापर : पाणीप्रश्नाभोवतीच सदस्यांची चर्चा, गोंधळामुळे आला अनेकदा व्यत्यय

Involvement of protesters in a meeting of 'planning' infiltration | ‘नियोजन’च्या बैठकीत आंदोलकांची घुसखोरी

‘नियोजन’च्या बैठकीत आंदोलकांची घुसखोरी

Next

नाशिक : पाण्याच्या प्रश्नावर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भूमिका स्पष्ट करावी या मागणीसाठी जमलेल्या आंदोलनकर्त्यांनी थेट जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केलेली घुसखोरी, त्यांना हुसकवण्यासाठी पोलीस बळाचा करावा लागलेला वापर व बैठकीसाठी जमलेल्या सदस्यांनी फक्त पाणी प्रश्नावरच केलेल्या चर्चेत जिल्हा नियोजन समितीचा पुढच्या वर्षाच्या ८७३ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली.
जिल्हा नियोजन समितीची बैठक दुपारी एक ऐवजी अडीच वाजता सुरू होताच, पालकमंत्री व त्यांच्या समवेत सभागृहात आलेल्या लोकप्रतिनिधींसोबत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनीही थेट बैठकीत घुसखोरी केली. हातात काळे झेंडे घेत घुसलेल्या या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न करताच, प्रवेशद्वारावरच रेटारेटी व झोंबाझोंबी झाली. सभागृहात आंदोलनकर्त्यांची घोषणाबाजी सुरू करताच, वातावरण तप्त झाले. शासकीय अधिकाऱ्यांनी वारंवार विनंत्या करूनही आंदोलनकर्ते बाहेर निघत नसल्याचे पाहून अखेर पालकमंत्री गिरीश महाजन यांनीच ध्वनिक्षेपकाचा ताबा घेत, सभागृहातून बाहेर पडा अन्यथा पोलिसांच्या मदतीने बाहेर फेकू असा इशारा दिला, तरीही आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर पोलिसांनाच सभागृहात पाचारण करावे लागले व त्यांनी अक्षरश: आंदोलनकर्त्यांच्या मुसक्या आवळत त्यांना बाहेर काढले. जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपल्यावर पाण्याच्या प्रश्नावर चर्चा करू असे आश्वासन पालकमंत्री महाजन यांनी दिले, परंतु त्यावर समाधान न झालेल्या आंदोलनकर्त्यांनी सभागृहाच्या बाहेरच ठिय्या मारत जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. दरम्यान, बाहेर आंदोलनकर्त्यांची घोषणाबाजी सुरूच असल्याने सभागृहातील लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांची अस्वस्थता क्षणाक्षणाला वाढली, पोलिसांनी आंदोलकांना शांत करण्याचे प्रयत्न करूनही त्यात यश आले नाही. अखेर या गदारोळात बैठक सुरू होताच, आमदार नरहरी झिरवाळ, जि.प. सदस्य शैलेश सूर्यवंशी यांनी जलयुक्त शिवाराच्या कामाचा मुद्दा उपस्थित करून जिल्हा नियोजन समितीचा निधी फक्त जलयुक्त शिवाराच्या कामासाठीच वापर केला जात असल्याने अन्य कामे होत नसल्याचे सांगितले. त्यामुळे आमदार विकास निधी सिंचनाच्या अन्य कामांसाठीही वापरण्याची मुभा मिळावी त्याचबरोबर जलयुक्तच्या कामांसाठी गावांची संख्या वाढवावी अशी मागणी केली. त्याच्या या मागणीशी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री चुंभळे यांनीही सहमती दर्शविली व बंधाऱ्याच्या दुरूस्तीसाठीही निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली. आमदार जिवा पांडू गावित यांनी जिल्ह्यातील पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळविल्यास पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही असे सांगितले. आमदार निर्मला गावित यांनीही इगतपुरी तालुक्यात छोटे-छोटे बंधारे बांधले जावेत जेणेकरून पाण्याचा प्रश्न सोडविण्यास मदत होईल असे सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Involvement of protesters in a meeting of 'planning' infiltration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.