आयपीएलवर सट्टा; बुकी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:32 AM2018-04-24T00:32:48+5:302018-04-24T00:32:48+5:30
सध्या आयपीएलचा ज्वर सुरू असून, सट्टाबाजारही तापला आहे. आयपीएल मालिकेतील चेन्नई विरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या झालेल्या सामन्याप्रसंगी शहरामध्ये पैशांच्या बोलीवर सट्टा खेळणाऱ्या बुकिंना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले.
नाशिक : सध्या आयपीएलचा ज्वर सुरू असून, सट्टाबाजारही तापला आहे. आयपीएल मालिकेतील चेन्नई विरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या झालेल्या सामन्याप्रसंगी शहरामध्ये पैशांच्या बोलीवर सट्टा खेळणाऱ्या बुकिंना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील औद्योगिक वसाहतीमधील एका हॉटेलच्या खोलीतून आयपीएलच्या चेन्नई-राजस्थान सामन्याचे थेट प्रक्षेपण अॅन्ड्रॉइड मोबाइलवर इंटरनेटच्या माध्यमातून बघत सामन्याच्या स्थितीवर सट्टा लावताना तीन बुकी पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी या कारवाईत संशयित गुरुप्रितसिंग हरबनसिंग जट (रा. केवडीबन तपोवन), अमित अनिल देसले (पंचवटी), सतनाम दिलीपसिंग राजपूत (कोणार्कनगर) यांना अटक केली आहे. राजपूत याच्या सांगण्यावरून संगनमताने त्याच्या मारुती स्विफ्ट कारचा (एम.एच.०४, डी.वाय४६०८) वापर करत अंबडमधील एका हॉटेलमध्ये सट्टा खेळला जात होता. या कारवाईमध्ये गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक निरीक्षक महेश कुलकर्णी, पोपट करवाळ, विजय गवांदे, मोहन देशमुख, आदींनी सहभाग घेतला. आयपीएलसंदर्भात शहरात अशाप्रकारे कुठेही अवैध व्यवसाय होत असल्यास नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले आहे.
कोडद्वारे बोली
संबंधित तीनही बुकिंनी इंटरनेटवर लाइव्ह सामना बघत एका शंभरपानी मोठ्या वहीत लिहिलेल्या कोडवर्डद्वारे बोली लावली होती. यानुसार फोनवर बुकी सट्टा घेताना पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी सदर वहीसह नऊ मोबाइल, स्विफ्ट कारसह काही रोख रक्कम असा एकूण ४ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यांच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या गुन्ह्यातील पुढील तपासासाठी संशयितांना अंबड पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.