नाशिक जिल्ह्यात दरोडेखोरांची इराणी टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2022 01:47 AM2022-02-11T01:47:06+5:302022-02-11T01:47:40+5:30
जिल्ह्यातील येवला शहरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या इराणी टोळीच्या मुसक्या बांधण्यात स्थानिक गुन्हे शाखा पथकासह तालुका पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून दरोड्यासाठी लागणाऱ्या हत्यारांसह दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या टोळीकडून येवल्यात मोठा दरोडा टाकण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला.
नाशिक : जिल्ह्यातील येवला शहरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या इराणी टोळीच्या मुसक्या बांधण्यात स्थानिक गुन्हे शाखा पथकासह तालुका पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून दरोड्यासाठी लागणाऱ्या हत्यारांसह दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या टोळीकडून येवल्यात मोठा दरोडा टाकण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मनमाड-येवला रोडवरील तांदुळवाडी फाट्यावरील लॉन्ससमोर बुधवारी, (दि. ९) रात्री नाकाबंदी करीत होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी, रात्री ८.३० वाजता या भागात दरोडा किंवा मोठे गुन्हेगारी कृत्य करण्याच्या उद्देशाने एक इराणी टोळी येत असल्याची माहिती देऊन, नाकाबंदी अधिक कटाक्षाने करण्याच्या सूचना दिल्या होत्या. येवला शहरात २ आयशर ट्रकमध्ये ४ ते ५ इसम दरोडा अगर मोठा गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने आलेले आहेत, नमूद ट्रक व त्यातील इसमांची खात्री करून आवश्यक ती कारवाई करण्याचे वरिष्ठांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर, मनमाडच्या दिशेने येवला शहराकडे येणारी वाहने तपासत असताना पोलीस पथकाने दोन ट्रकमधून चौघांना ताब्यात घेतले. एक पळून जाण्यात यशस्वी ठरला. सिकंदरअली यावरअली (३८) रा. गेवराई, जि. बीड, अलीखान अफजल रोग (३०) रा. नेहरूनगर अकोट, जि. अकोला, रावतअली बहुमायुअली (३८) रा. अशोकनगर झोपडपट्टी, अकोला जि. अकोला, सुधीर सिध्दार्थ कांबळे ( ३०) अशोक नगर, अकोला, जि. अकोला अशी या संशयितांची नावे असून सायम मंजुळकर रा. अमरावती हा संशयित पोबारा करण्यात यशस्वी झाला.
दहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत
संशयितांच्या अंगझडतीत दरोड्यासाठी आवश्यक असलेली हत्यारे, अन्य तत्सम सामग्री तसेच दोन्ही वाहनांच्या किमतीसह एकूण १० लाख ४७ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यासंदर्भात तालुका पोलिसांत दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, या टोळीकडून मोठा कट उघड होण्याची तसेच अन्य क्लिष्ट गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.