अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा
By admin | Published: February 20, 2015 01:39 AM2015-02-20T01:39:04+5:302015-02-20T01:39:33+5:30
अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा
सिडको : महापलिकेच्या सिडको पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे सिडकोत उन्हाळ्याच्या प्रारंभीच अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यामुळे महिलावर्गात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून, पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.दरवर्षी सिडकोत उन्हाळ्याच्या प्रारंभापासूनच पाणीप्रश्न गंभीर बनतो. दरवर्षी यात सुधारणा करण्याचे आश्वासन मनपाकडून देण्यात येते, परंतु परिस्थिती जैसे थेच असते यंदाच्या वर्षी फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाल्यानंतरच लगेचच सिडकोत कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होण्यास प्रारंभ झाला आहे. सिडकोच्या पाणीप्रश्नाबाबत प्रभाग सभेत नगरसेवक कायमच अधिकाऱ्यांना विचारणा करतात, परंतु अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष काम केले जात नसल्याचे चित्र बघावयास मिळते. सिडकोतील बहुतांशी पाणीपुरवठा हा विस्कळीत झाला असून, दररोजच पाइपलाइन, व्हॉल्व गळतीच्या घटना घडतात. यामुळे एकीकडे मनपाच्याच दुर्लक्षामुळे दररोज हजारो लीटर पाणी वाया जाते, तर दुसरीकडे मात्र नागरिकांना पिण्यापुरतेही पाणी मिळत नाही. उन्हाळ्यास नुकतीच सुरुवात झाली असून, मनपाने याबाबत त्वरित दखल घेत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची गरज आहे. अन्यथा यापुढील काळात नागरिकांना पाणीप्रश्नांवरून आंदोलन करण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. (वार्ताहर)