प्रभाग सभापतींच्याच प्रभागात अनियमित घंटागाडी
By Admin | Published: December 27, 2015 10:33 PM2015-12-27T22:33:01+5:302015-12-27T22:41:24+5:30
प्रभाग तीन : नागरिक त्रस्त; नगरसेवकांच्या तक्रारीकडेही दुर्लक्ष
पंचवटी : कधी घंटागाड्यांना डिझेल नाही, तर कधी घंटागाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन नाही, अशी परिस्थिती असताना आता तर पंचवटी प्रभाग समिती सभापतींच्या प्रभाग क्रमांक ३ मध्येच अनियमित घंटागाडी येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दोन दिवसांपूर्वीच ठेकेदाराने घंटागाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन न दिल्याने दुपारपर्यंत घंटागाड्या बंद होत्या. त्याचा परिणाम पंचवटीतील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे साचले होते.
पंचवटीतील हिरावाडीतील प्रभाग क्रमांक ३ हा प्रभाग सभापती सुनीता शिंदे व नगरसेवक रुचि कुंभारकर यांचा असून, गेल्या काही दिवसांपासून या प्रभागातील काही भागात चार ते पाच दिवसांआड घंटागाडी जात असल्याने नागरिक रस्त्यावर कचरा टाकतात. गुरुवारच्या दिवशी सकाळी दहा वाजेनंतरही शक्तीनगर परिसरात घंटागाडी आलेली नव्हती.
गेल्या काही दिवसांपासून सभापतींच्याच प्रभागात अनियमित घंटागाडी येत असल्याने लोकप्रतिनिधींपाठोपाठ नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक ३ हा विस्ताराने मोठा असल्याने या भागात दोनपेक्षा जास्त घंटागाड्यांची सोय करण्यात आलेली आहे. मात्र प्रत्यक्षात दोनच घंटागाड्या फिरतात तर उर्वरित घंटागाड्या कुठे असतात, असा सवाल नागरिकांनी केला आहे. परिसरात उशिराने घंटागाड्या दाखल होत असल्याने नागरिकांना नाइलाजास्तव कचरा रस्त्यावर आणून टाकावा लागत असल्याने प्रशासनाने ठेकेदाराविरुद्ध कारवाईची पाऊले उचलावीत, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)